पुणे : चांदणी चौकातील पूल तयार करताना त्यावरून एनडीएचे ७० टनांचे रणगाडे जातील, इतका मजबूत करण्याचे आम्हाला सांगितले हाेते. त्यानुसार आम्ही तो पूल बनविला होता. त्यासाठी खूप स्टील वापरल्याचे बोलेले गेले; पण तसे काहीही केलेले नाही. पुलाला जेवढे स्टील आवश्यक असते, त्यानुसारच ते वापरले, असे स्पष्टीकरण चांदणी चौकातील पूल बांधणारे सिव्हिल इंजिनिअर व डिझायनर सतीश मराठे (वय-७६) यांनी सांगितले.
मोठा गाजावाजा होऊन चांदणी चौकातील पूल पाडण्यात आला. या पार्श्वभूमीवर हा पूल बांधणारे सतीश मराठे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. ज्यांना हा पूल पाडायचा होता, त्यांना ते नीट जमले नाही, त्यामुळेच ते खोटं बोलत आहेत, असेही मराठे म्हणाले.
पुलाचे काम आमच्याच मार्फत
मी आणि माझे भागीदार मित्र अनंत लिमये आम्ही दोघांनी बरली इंजिनिअर्स नावाची कंपनी होती. त्या पुलाचे डिझाइन मीच केले होते. केंद्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ते काम आमच्याच मार्फत केले होते. तेव्हा कुलकर्णी आणि देशपांडे नावाचे सरकारी इंजिनिअर होते. त्यांनीदेखील प्रामाणिकपणे काम केले. मी आणि अनंत लिमये दोघांनी १९८२ ते २००२ दरम्यान २५ पूल बांधले आहेत. त्यात पुणे विभागात अधिक आहेत. कोल्हापूर, सातारा, नाशिक, निफाड येथे पण बांधले आहेत. निफाड येथील शंभर मीटरचा पूल, तर शंभर दिवसांत बांधला.
सतीश मराठे म्हणाले...
- साधारण १९९२ साली आम्ही आळंदीचा पूल बांधला आहे. तेव्हा पुलावरून पाणी जाईल, हे आम्हाला सांगितले नव्हते; कारण तेव्हा पूररेषा खूप खाली होती. आता पुलावरून पाणी जातेय, तरी तो उभा आहे.
- मागे म्हात्रे पुलाजवळील रस्ता खचला होता; पण पूल पडला असे बोलले गेले. पूल आणि रस्ता यांच्यात जमीन-आस्मानचा फरक आहे.
आम्ही आमचा व्यवसाय बंद केला...
पीडब्लूडीकडील पैसे संपल्यानंतर त्यांनी पीपीपीअंतर्गत तुम्ही बांधा, पैसे खर्च करा आणि मग टोलद्वारे पैसे घ्या, अशी योजना जाहीर केली. तेव्हा एकदम ३०० ते ४०० कोटी रुपये जमा करणे शक्य नव्हते. मग आम्ही आमचा व्यवसाय २००२ पासून बंद केला.
आता पुलाचे आयुष्य निम्म्यावर !
मी १९७० मध्ये इंजिनिअरिंगची पदवी मिळविली. तेव्हा आम्हाला एका पुलाचे आयुष्य १०० वर्षे असल्याचे सांगितले गेले. माझ्या मुलाने पदवी घेतली तेव्हा त्याला पुलाचे आयुष्य ५० वर्षांचे असते, असे सांगितले. कोणाला नफा किती जास्त हवा, त्यावर सर्व ठरतं. चांगलं काम करूनही नफा मिळतो. ज्यांना अधिक हवा असतो, ते मग चोरीचे काम करतात.