पुणे : सर्व सामाजिक संस्थांच्या कार्यालयात असलेल्या नोंदणीचा वापर करून धर्मदाय आयुक्त कार्यालयाने कोरोना काळात मदतीचा सेतू उभा केला आहे. गरजूंना रुग्णालयात दाखल करून घेण्यापासून ते जेवण पुरविण्यापर्यंतचे काम या माध्यमातून करण्यात येत आहे.
धर्मादाय आयुक्त कार्यालयात सर्व सामाजिक संस्थांची नावे, पत्ता, पदाधिकारी यांच्या नोंदी असतात. त्याचाच उपयोग यात करण्यात आला आहे. नोंदणी असलेल्या संस्थांबरोबर, रुग्णालयांबरोबर संपर्क साधून ते कोणती मदत करू शकतात याचा अंदाज घेतला. विभागीय धर्मादाय सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के, पुणे जिल्हा सहायक आयुक्त एन. व्ही. जगताप यांच्या विचारातून ही हेल्पलाईनची कल्पना पुढे आली व त्वरित कार्यरतही झाली. कार्यालयातील सर्व सुनावण्या सध्या कोरोनामुळे बंद आहेत. त्यामुळे साहेबांसह सर्व कर्मचारीही सध्या या मदतकार्यातच गुंतले आहेत. याशिवाय बुक्के यांनी सरकारच्या महसूल, पोलीस, आरोग्य, महापालिका या कार्यालयांमार्फत मिळणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती संकलित केली. गरीब व गरजू लोकांपर्यंत ती पोहचवली जाते.
बेडसाठी मदत, जेवणाचीही सुविधा
आता बेडसाठी फोन आला की लगेच कर्मचारी त्यांच्याकडे नोंदणी असलेल्या रुग्णालयाला फोन करतात, किंवा कोणाला एखाद्या १०० , २०० च्या समुदायाला जेवण हवे असेल तर लगेच एखाद्या मंडळाला फोन जातो. रुग्णवाहिका, औषधे, प्लाझ्मा डोनर, जेवण यासाठीही मदत होते. धर्मादाय आयुक्त कार्यालयाचा फोन म्हणजे सहसा नकार मिळतच नाही व काम होऊन जाते असाच कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे.
धर्मादाय आयुक्त कार्यालय हेल्पलाईन नंबर
(०२०)२६१६३८९१, (०२०)२६१६३८९२,(०२०)२६१६२७२८,(०२०)२६१६९८९३ हे या हेल्पलाईनचे दूरध्वनी क्रमांक आहेत.
---
कोट
सामाजिक जबाबदारी म्हणून हे काम केले जात आहे. यात सर्वच सहकारी अधिकारी, कर्मचारी यांची मदत होत आहे. त्यातूनच अशी मदत करणे शक्य होत आहे
सुधीरकुमार बुक्के, धर्मादाय सह आयुक्त, पुणे विभाग