पुणे : चांदणी चौकातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी अडथळा ठरत असलेल्या पुलाला पाडण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. हा पूल दि.२ ऑक्टोबरला पहाटे दाेन वाजता तुकड्यांमध्ये केवळ पाच सेकंदांमध्ये पाडण्यात येईल. त्यासाठी सुमारे दीड कोटींचा खर्च येणार आहे.
यासाठीचे नियोजन पूर्ण झाले आहे. यात दि. १ ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजल्यापासून दि. २ ऑक्टोबरच्या सकाळी आठ वाजेपर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
या बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी संबंधित यंत्रणांची बैठक झाली. त्यात जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन, वाहतूक पोलीस यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. डाॅ. देशमुख म्हणाले, हा पूल पाडण्यापूर्वी येथील सर्व सेवावाहिन्या स्तलांतरित करण्यात आल्या आहेत. पूल पाडल्यानंतर तयार होणाऱ्या वाढीव लेनसाठी सर्व भूसंपादन पूर्ण झाले आहे. पूल पाडण्यापूर्वी वाहतुकीचे नियोजन पूर्ण केले असून, यासाठी शनिवार हा कमी वाहतुकीचा दिवस निवडला आहे. रात्री वाहतूक तुलनेने कमी असल्याने, तसेच रात्री वेळ योग्य असल्याचे संबंधित यंत्रणांचे म्हणणे होते. त्यानुसार ही वेळ निश्चित केली आहे. या काळात वाहतूक पोलीस तसेच पुणे व पिंपरीचे पोलीस उपस्थित राहतील.
पूल पाडण्यासाठी
- सुमारे ६०० किलो स्फोटकांचा वापर
- पुलाला १३०० ठिकाणी दीड मीटर खोलीची छिद्रे
- तुकडे (फ्रॅगमेंटेशन) करून केवळ पाच ते सहा सेकंदांत पडणार पूल
- जिवंत स्फोटके नाहीत याची खात्री करून राडारोडा उचलणार
- यासाठी चार डोझेल, आठ पोकलेन, ३० टीप्पर आणि १०० मजूर काम करणार
- सहा तासांत उचलणार राडारोडा
- २०० मीटरच्या परिसरात सुरक्षित ठिकाणी केवळ चार जण थांबणार
- एक स्फोट करणारा, एक प्रकल्प व्यवस्थापक, एक स्फोट डिझायनर व एक पोलीस
असा असेल वाहतुकीत बदल
वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे म्हणाले, पूल पाडण्याच्या दिवशी कात्रज चौकापासून हिंजवडी राजीव गांधी पुलापर्यंत सर्व ठिकाणी वाहतूक पोलीस असतील. मुंबईकडून येणारी जडवाहतूक तेळगाव येथील टोल नाक्यावरच थांबविण्यात येईल. साताऱ्याकडून येणारी वाहतूक खेड शिवापूर टोल नाक्यावरच थांबवली जाईल. हलकी वाहने पिंपरी, बाणेर, औंधमार्गे शिवाजीनगर, स्वारगेट, कात्रजपासून पुन्हा महामार्गावर वळविण्यात येईल. साताऱ्याकडून येणारी हलकी वाहने जुना कात्रज घाट कात्रज चौक, स्वारगेट, टिळक रस्ता, शिवाजीनगरहून औंध किंवा पिंपरीमार्गे मुंबईकडे वळविली जाईल.
पूल पाडल्यानंतर तयार होणाऱ्या धुळीचे लोट उठणार आहेत. तसेच परिसरातील इमारतींना धोका पोहाेचू शकतो याचा अंदाज घेऊन २०० मीटर परिसरातील तीन इमारतींना पूर्णपणे मोकळे करण्याची नोटीस देण्यात येईल. या तिन्ही इमारती हॉटेल असून अन्य कोणत्याही रहिवासी इमारती नाहीत. नागरिकांनी या काळात या मार्गाने जाणे टाळावे. केवळ आपत्कालिन परिस्थितीत जात असल्यास पर्यायी मार्गाचा वापर करावा. याबाबत सातारा, कोल्हापूर जिल्हाधिकारी तसेच वाहतूकदारांच्या संघटनेलाही कळविण्यात येणार आहे.
- डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी
स्फोटके आणण्यासाठी पुण्यातील एका डिलरला कंत्राट दिले आहे. ही स्फोटके एका व्हेसलमध्ये (बाटली किंवा भरणी) ठेवण्यात येणार आहेत. स्फोटाच्या चार तास आधी ते घटनास्थळी पोहाेचतील. कमीतकमी वेळेत पूल पाडून नागरिकांना याचा कमीत कमी त्रास होईल, याची खबरदारी घेतली जाईल.
- उत्कर्ष मेहता, इडिफाईस इंजिनियरिंग, कंत्राट दिलेली कंपनी