धायरी : वारंवार होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी धायरी फाटा येथील स्व. आ. रमेशभाऊ वांजळे उड्डाणपुलाला जोडून 'वाय फाटा' करण्यास पुणे मनपा प्रशासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी सन २०१९-२० या आर्थिक वर्षात ५ कोटी रुपयांची भरीव तरतूदही करण्यात आली होती. मात्र धायरी फाटा परिसरातील जागामालकांनी जागा ताब्यात न दिल्याने या प्रस्तावित पुलाचे काम रखडले असल्याची माहिती समोर येत आहे.
धायरी फाटा येथील येथील स्व. आ. रमेशभाऊ वांजळे उड्डाणपुलाचा उपयोग धायरी नऱ्हे या गावाकडे जाणाऱ्या नागरिकांना होत नसल्याने सदर उड्डाणपुलाचा वापर पूर्णपणे होत नाही. तसेच उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रस्त्यावरून धायरी गावाकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढून तेथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. तसेच पादचाऱ्यांनाही त्रास होत आहे. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सध्या असलेल्या स्व.रमेशभाऊ वांजळे उड्डाणपुलास 'वाय' आकाराचा करून एक रस्ता नांदेड सिटीकडे व एक रस्ता धायरी गावाकडे चाकणकर हाउसपर्यंत जोडण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.
या पुलाचे काम लवकर व्हावे, यासाठी खडकवासला शिवसेनेचे विभागप्रमुख महेश पोकळे यांनी महापालिकेच्या आयुक्तांना लेखी पत्र दिले आहे.
या पुलास 'वाय' आकाराचा फाटा करण्यासाठी एकूण २० कोटी निधी अपेक्षित आहे, यासंदर्भात विद्यमान नगरसेवक हरिदास चरवड यांनी त्या वेळी ठराव सादर केला होता. तसेच निवेदनाद्वारे २० कोटी रुपयाच्या तरतुदीची मागणीदेखील केली होती.त्यास पुणे मनपाच्या शहर सुधारणा समिती आणि मुख्य सभेने मंजुरीही दिली होती. मागील वर्षी महापालिकेचे प्रकल्प अधिकारी, शहर सुधारणा समितीचे पदाधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांनी या प्रस्तावित कामाची पाहणीही केली होती. याबाबत जागामालकांकडून जागा लवकर ताब्यात घेऊन पुलासंदर्भात पुढील कार्यवाही लवकर केल्यास धायरी फाटा येथील वाहतूककोंडीच्या विळख्यात अडकलेले रस्ते मोकळा श्वास घेऊन नागरिकांनाही दिलासा मिळणार आहे.
चौकट :
या भागातील नागरिकांची होईल सोय ....
प्रत्यक्षात रस्त्यासाठी २४ मीटरचा रस्ता गरजेचे आहे. मात्र जुन्या इमारती पाडून हा 'वाय' आकाराचा फाटा करावा लागणार आहे. या उड्डाणपुलाला 'वाय' आकाराचा फाटा जोडल्यास धायरी, नऱ्हे, डीएसके विश्व, बेनकरवस्ती, रायकरमळा आदी भागांतील नागरिकांना वाय आकारावरून थेट धायरीमध्ये जाण्याची सोय होणार आहे.
कोट :
याबाबत संबंधित जागामालकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर मार्ग काढून पुलाचे काम लवकर सुरु करण्यात येईल. - हरिदास चरवड, विद्यमान नगरसेवक
नागरिकांना रोजच वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. महापालिकेने हे काम लवकर करावे, अन्यथा शिवसेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल. - महेश पोकळे, विभागप्रमुख, शिवसेना खडकवासला मतदारसंघ
फोटो ओळ:
१. प्रस्तावित 'वाय' आकाराचा पूल
२. धायरी फाटा येथील येथील स्व. रमेशभाऊ वांजळे उड्डाणपूल