- राजू इनामदार
पुणे : पूल नक्की करतात तरी काय?, दोन भागांना जोडतात, दोन संस्कृतींचे मीलन घडवतात, शहराला ओळख देतात, हे सगळं काही पूल करतातच; पण यापेक्षाही ते शहरवासीयांच्या मनात स्थान मिळवतात. ते कधी मानाचे असते, तर कधी वेदना देणारे. पण प्रत्येक शहरवासीयांना शहरातील पुलांविषयी काही ना काही तरी भावना असतातच. मागील काही महिन्यांपासून चांदणी चाैकातील पूल, तर रविवारी झालेल्या भीषण अपघातानंतर नवले पूल चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या पार्श्वभूमीवर ही मालिका चांगल्या, वाईट दाेन्ही बाजूंचा वेध घेत आहे.
पुणे शहराची ओळख शिवकाळापासूनची. कदाचित त्याही आधीची. पण शिवशाही, मग पेशवाई, ब्रिटिश अमल, त्यानंतर स्वातंत्र्याची लढाई आणि आता स्वातंत्र्याेत्तर काळ. या सगळ्या वाटचालीत कोणती गोष्ट टिकून असेल, तर ती म्हणजे पुण्यातील पूल. मुळे-मुठेवरचे पूल ही पुण्याची ओळख त्यातूनच तयार झाली. पुण्यातील हे पूल दुसऱ्या शहरांमधील नागरिकांचे कोण्या एके काळापासूनचे आकर्षणाचे विषय आहेत. पुण्यातील अशा काही पुलांचा धावता धांडोळा दर मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी घेतला जाणार आहे.
नदीवरचा पूल हा समज उड्डाणपुलांनी खोटा ठरवला. वाहतुकीचा मुख्य रस्त्यावरचा ताण कमी करण्यासाठी त्याच रस्त्यावर एक पूल ही नवी नगररचना अस्तित्वात आली. पुणे यातही अग्रभागी आहे. सन १७६१ मधील लाकडी पूल असेल किंवा मग कालपरवा झालेला नळस्टॉपचा दुहेरी उड्डाणपूल. प्रत्येक पुलाला स्वत:ची अशी ओळख आहे. पूल जुना असेल तर इतिहास आहे, अलीकडचा असेल, तर मग वर्तमान आहे. काही पूल टक्के टोनपे सहन करत टिकून आहेत. काहींचा आर्ट प्लाझा झाला, त्यांना पर्यायी पूल उभे राहिले.
ही आहेत खास वैशिष्ट्य
- पुण्यात लहान-मोठे असे १०० पेक्षा जास्त पूल आहेत.
- यातील काही पूल थेट उत्तर पेशवाईतील आहेत. ते बांधण्याची त्यावेळची कारणेही मजेशीर आहेत.
- काही पूल इंग्रजांनी बांधलेले आहेत. अजूनही मजबूतपणा टिकून असणे हे त्याचे खास वैशिष्ट्य.
- अलीकडच्या काळात बांधलेल्या पुलांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. त्यावर संध्याकाळी रंगीत प्रकाशझोत वगैरे पडतात.
- खरे तर महापालिकेकडे त्यांच्या हद्दीतील पुलांचे रेकॉर्ड हवे. नावांशिवाय त्यांच्याकडे दुसरे काही नाही.
- मध्यंतरी सर्व पुलांची अशी माहिती जमा करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तो काही कारणांनी मध्येच थांबला.