पुणे : भारत व इस्राईलमधील असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण नात्यामुळे ही द्विपक्षीय भागीदारी दिवसेंदिवस अधिकाधिक सशक्त हाेत अाहे, असे मत इस्राईलचे भारतामधील राजदूत डॅनियल कार्मन यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग अाणि यशवंतराव चव्हाण नॅशनल सेंटर अाॅफ इंटरनॅशनल सिक्युरिटी अॅण्ड डिफेन्स अनॅलिसिस विभागामार्फत इंडिया अॅण्ड इस्राईल, अ मल्टीफॅसेटेड स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप या विषयावर कार्मन यांचे व्याख्यान अायाेजित करण्यात अाले हाेते. या कार्यक्रमास प्र. कुलगुरु डाॅ. एन. एस उमराणी, कुलसचिव डाॅ. अरविंद शाळीग्राम, संरक्षण व सामरिकशास्त्र विभागप्रमुख डाॅ. विजय खरे व मुंबईतील इस्राईलच्या दूतावासामधील राजकीय अधिकारी व विशेष प्रकल्प अधिकारी अनय जाेगळेकर उपस्थित हाेते.
अापल्या मनाेगतात कार्मन म्हणाले, पारंपारिक शीतयुद्ध अाणि अलिप्ततावादी चळवळ, पाश्चिमात्य गट व कम्युनिस्ट गट अशा गटांभाेवती केंद्रित झालेले जागतिक राजकारण हे गेल्या काही दशकांमध्ये बदलले अाहे. केवळ लष्कराचे सामरिक सहकार्य असलेल्या गटांच्या राजकारणाची जागा अाता शिक्षण, पर्यावरण, अाराेग्य अशा अनेकविधी क्षेत्रांतील व्यूहात्मक भागीदारींनी घ्यावयास सुरुवात केली अाहे. विविध देशांमध्ये अशा भागीदारी प्रस्थापित हाेत अाहेत. पारंपारिक भूराजकीय धाेरणांच्या पलीकडे जागतिक राजकारणाची वाढलेली व्याप्ती, हे या नव्या काळाचे मुख्य वैशिष्ट्य अाहे. या नव्या काळात भारत व इस्राईलमधील द्विपक्षीय भागीदारीस निश्चितच उज्ज्वल भविष्य अाहे.
मुंबईतील इस्राईलच्या वकिलातीचे मुख्याधिकारी याकाेव्ह फिंकेलस्टीन यांनी इस्राईलच्या राजनैतिक अधिकाऱ्यासाठी भारतात काम करणे हे अाव्हानात्मक व मानाचे असल्याचे मत व्यक्त केले.