लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मार्च महिन्यात सुरु झालेल्या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीची जबाबदारी पोलीसांवर आली. दिवस-रात्र बंदोबस्ताबरोबरच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई आणि संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी लोकांचा रोष पत्करला. पण त्याचवेळी रुग्णांचा मागोवा काढत संभाव्य ‘कोरोना पॉझिटिव्ह’ रुग्णांचा शोध घेणे, घरी विलगीकरणात असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर लक्ष ठेवणे, पुण्यात अडकलेल्या बेरोजगारांच्या भोजनाची सोय करणे, परप्रांतीयांना घरी जाण्यासाठी मदत करणे यासारख्या आजवर पोलीस दलाने कधीही न केलेल्या कामांचा बोजाही लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी लिलया वाहून नेला. कोरोनाची दहशत असतानाही नियोजन आणि समन्वयाद्वारे पुणे पोलिसांनी ही कामगिरी चोख बजावल्याने ‘कोरोना योद्धा’ म्हणून पोलिसांची प्रतिमा उजळली.
कोरोनाचे देशात रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्यावर परदेशाप्रमाणे आपल्या देशातही लॉकडाऊन करावे लागणार, त्यासाठी पोलिसांना काय करावे लागेल, याची पूर्वतयारी पुणे पोलिसांनी अगोदरच सुरु केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा करुन नियमावली बनवली. लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याने नागरिकांपासून सर्वच जणांसाठी सुरुवातीचा काळ कठीण होता.
लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करताना काही वेळा पोलिसांवर टीकाही झाली. पण त्यावेळी ते गरजेचे होते. ‘कॉट्रक्ट ट्रेसिंग’ करुन पोलिसांनी काही हजार संभाव्य कोरोना पॉझिटिव्ह शोधून दिले. तसेच लाखाहून अधिक परप्रांतीयांची रवानगी त्यांच्या गावी केली तर १६ लाखांहून अधिक जणांना अन्नधान्य पुरवले.
लॉकडाऊन शिथील होऊ लागताच गुन्हेगारी वाढली. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांबरोबरच दुखापत करण्याच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी मोक्का, झोपडपट्टी दादा (एमपीडीए) कायद्याचा कठोरपणे वापर केला. या वर्षभरात तब्बत ७७ जणांवर मोक्का कारवाई केली. त्यात प्रामुख्याने दीपक मारटकर यांची हत्या करणारी नायर टोळी, माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे आणि त्याच्या टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली.
चौकट
आधी काम, मग बोलणार
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर धडक कारवाईस सुरुवात केली आहे. गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी गंभीर गुन्ह्यांचे कलम लावण्याचे आदेश दिले. त्यामुळे गेल्या २ महिन्यात खुनाचा प्रयत्न केलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसते. घोड्यांच्या शर्यतीवरील बेकायदा बेटिंग, एकाचवेळी शहरातील सर्व गुन्हेगारांची झाडाझडती, गुन्हेगारांचे रेकॉर्ड अद्यावत करणे अशी कामे त्यांनी गेल्या दोन महिन्यात केली आहेत. त्याचबरोबर गुन्हे शाखेची फेररचना केली आहे. “आपण अगोदर काम करु नंतरच बोलू,” असा पवित्रा गुप्ता यांनी घेतला आहे.