पुणे : राज ठाकरेंनी घेतलेल्या भोंग्यांच्या भूमिकेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. त्यांनी ठाणे, औरंगाबाद या सभेत हा मुद्दा लावून धरला होता. आता पुण्यातही राज ठाकरेंची सभा होणार आहे. त्यानंतर राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. त्यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषेदत ५ जूनला अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. त्यानंतर विविध चर्चाना उधाण येऊ लागले. त्यातच उत्तर प्रदेशमधील खासदार ब्रिजभूषण यांनी राज ठाकरे येऊ देणार नाही असे सांगितले आहे. त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी तरच त्यांचे अयोध्येत स्वागत केले जाईल. असंही ते म्हणाले होते. परंतु मनसेने या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष न देता अयोध्या दौऱ्याच्या जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. मनसेच्या वतीने महाराष्ट्रातून बारा रेल्वे अयोध्येला जाणार आहेत.
पुण्यातही अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. मनसे शहर कार्यालयात अयोध्या दौऱ्याची नावनोंदणी सुरु आहे. त्याठिकाणी जवळपास २ ते अडीच हजार उत्तर भारतीय अयोध्येला येणार असल्याची माहिती एका उत्तर भारतीय नागरिकाने दिली आहे. नावनोंदणी सुरु असताना या नागरिकांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ब्रिजभूषण यांचा विरोध वेगळा आहे. आम्ही उत्तर भारतीय २५ वर्षांपासून इथे महाराष्ट्रात राहत आहोत. महाराष्ट्रात राहून आम्ही पुढे गेलोय. मग उत्तर प्रदेश मध्ये सुखी झालो. त्यांना त्याच्याबद्दल काही माहित नाही. ते तिकडं बोलतात त्याचा त्रास आम्हाला इथं होतोय. आम्ही सगळे राज साहेबांसोबत अयोध्येला जाणार आहे. जवळपास २ ते ३ हजारचा ग्रुप महाराष्ट्रातून अयोध्येला जाणार आहे. राज साहेब करतात ते योग्य आहे. ब्रिजभूषणला साहेब काय बोलतात हे कळत नाही, त्यांना मराठी कळत नाही. त्याला काही माहित नाही. उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रात संघर्ष झाल्यास आम्ही राज साहेबांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.