पुणे : सरकारी अधिकारी म्हटलं की बदली नियुक्तीचा खेळ पाठशिवणीला कायमचा ठरलेलाच असतो. पण मिळालेल्या सेवेच्या कालावधीत त्या भागात केलेले काम,राबविलेल्या उत्तमोत्तम अभिनव योजना,तुमची कार्यशैली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना दिलेली वागणूक..यांसारख्या बऱ्याच गोष्टी तुमची ओळख बदली झाल्यानंतर देखील कायम ठेवतात. अन पुढच्या ठिकाणी प्रस्थान करण्याआधी त्याठिकाणी दिला जाणारा निरोपाचा सन्मान सोहळा हे तुमच्या केलेल्या कामाची पोचपावती असते. अशाच एका 'दबंग आणि जिगरबाज'अधिकाऱ्याच्या निरोप समारंभ चर्चेचा विषय ठरला. निमित्त होते पोलीस उपमहानिरीक्षकपदी बढतीवर नागपूरला बदली झाल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचा मंगळवारी (दि. ८ ) झालेला निरोप समारंभ... एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी मिळून अशाप्रकारे जाहीर निरोप देण्याचा कार्यक्रम पुणे जिल्ह्यात प्रथमच झाला..
गेली २ वर्षे संदीप पाटील यांनी पुणे ग्रामीण पोलीस दलाचा कार्यभार पाहताना सर्वसामान्यांशी संपर्क वाढविण्याबरोबरच जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तसेच भीमा कोरेगावच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्याला महत्व दिले होते. त्यामुळे नागरिकांबरोबरच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात ते लोकप्रिय झाले होते. संदीप पाटील यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर अद्याप नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली नाही. उपअधीक्षक विवेक पाटील यांच्याकडे पाटील यांनी कार्यभार दिला. त्यानंतर जिल्ह्यातून आलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी पाटील यांच्या वाहनाला दोर लावून तो ओढत आवारात एक फेरी मारली. त्यावेळी उपस्थितांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. याप्रसंगी अनेक अधिकारी भावुक झाले होते.
काम करण्यासाठी गडचिरोली ला बदली मागून घेणारा 'दबंग आणि जिगरबाज' अधिकारी...
बदली करून गडचिरोलीला जाण्यास सहसा पुणे-मुंबईत रुळणाऱ्या अधिकाऱ्यांची शक्यतो मानसिकता नसते. पण पुण्यातून आपली बदली करण्यात आली नसून आपण ती मागून घेतली आहे, असे सांगणारे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणून वेगळे अधिकारी वाटतात. याबाबत पाटील म्हणतात, पाच वर्षांपूर्वी गडचिरोलीत असताना छोट्या कामांना सुरुवात केली होती. तेथे काम करण्यास अधिक वाव असल्याने आपण बढतीवर जाताना गडचिरोली परिक्षेत्र म्हणून मागून घेतली. पुस्तक भेट योजनेचा चांगला प्रतिसाद मिळाला़ तेथे भरपूर काम करण्यास वाव आहे. त्यामुळे आपण गडचिरोलीला पसंती दिली.
पुण्यातील कार्यकाळाबद्दल बोलताना संदीप पाटील म्हणाले, पुणे ग्रामीण येथे २ वर्षापूर्वी आलो, तेव्हा कोरेगाव भीमा येथे आदल्या वर्षी दंगल झाली होती. त्यामुळे यंदा देशभरातून मोठ्या प्रमाणावर लोक येणार, त्यातून काही अघटित घडणार अशी भीती व्यक्त केली जात होती. पोलिसांचे मनोबलही खालावले होते़ २०१९ मध्ये ते सर्वात मोठे आव्हान होते़ देशभरातील मिडियाचे त्याकडे लक्ष होते. मोठा बंदोबस्ताबरोबरच सर्वांना विश्वासात घेऊन १ जानेवारीचा कार्यक्रम शांततेत पार पडल्याने देशभर चांगला संदेश गेला.
६६ गुन्हेगारी टोळ्यांवर मोकासह विविध प्रतिबंधक कायद्यांचा वापर करुन त्यांच्यावर नियंत्रण आणले. पारदर्शक प्रशासन देण्याचा प्रयत्न केला़ बारामती येथे उपमुख्यालय सुरु करण्याचा प्रस्ताव मंजूर करुन घेतला. पोलिसांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या़ पुणेकरांनीही आपल्या प्रयत्नांना चांगली साथ दिली.
खरंतर महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस महासंचालकांना निवृत्तीच्या वेळी अशा प्रकारे समारंभातून निरोप दिला जातो. मात्र, बढतीवर बदली झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्याला जिल्ह्यात अशा अनोख्या पद्धतीने प्रथमच जाहीर निरोप समारंभ झाला.