बारामती: बारामती विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार विक्रमी मताधिक्क्याने विजयी झाल्यानंतर बारामतीत विजयी जल्लोष सुरू आहे. शहरात अक्षरश: दुसरी दिवाळी साजरी झाली. एका अवलिया बारामतीकराच्या वतीने अजित पवार यांंना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी या व्यावसायिकाने चक्क ४८ हजार स्क्वेअर फूट मोफत फ्लेक्स प्रिंटचे वाटप केले आहे.
बारामती येथील वैष्णवी ग्राफिक्स तर्फे उपमुख्यमंत्री तथा बारामती विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार अजित पवार यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ‘डिझाइन घेऊन या आणि मोफत फ्लेक्स प्रिंटिंग घेऊन जा’, असे आवाहन वैष्णवी ग्राफिक्स तर्फे करण्यात आले होते. या आवाहनाला बारामती शहर आणि तालुक्यातून उदंड प्रतिसाद मिळाला. पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या बारामती विधानसभेतील २८० फ्लेक्सची प्रिंटिंग यानिमित्ताने झाली.
या अनोख्या उपक्रमाविषयी माहिती देताना वैष्णवी ग्राफिक्सचे संस्थापक आयर्नमॅन सतीश ननवरे व सपना ननवरे म्हणाले, बारामतीची आज प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग प्रगती झालेली आहे. याचे श्रेय ‘अजितदादां’ना आहे. पुढच्या २५ वर्षांची विकासाची दृष्टी ठेवून अजितदादांनी आज बारामती संपूर्ण बारामती तालुका सुजलाम सुफलाम केलेला आहे. विधानसभेतील निकालाने या सर्व बाबींवर शिक्कामोर्तब केलेले आहे. अजित दादांना प्रचंड मताधिक्य देण्याची परंपरा बारामतीकरांनी कायम ठेवत एक लाखाहून अधिकचे लीड यंदाही दिलेले आहे. हाच आनंद साजरा करण्यासाठी आम्ही हा उपक्रम अजित दादांचा एक समर्थक म्हणून आयोजित केला आहे. माझ्या उद्योगाच्या माध्यमातून अजित दादांना शुभेच्छा देण्याचा हा माझा अल्प प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.