पुणे : पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. याच प्रकरणी शिवसेना नेते व माजी वनमंत्री यांना राजीनामा देखील द्यावा लागला आहे. मात्र, दिवसेंदिवस हे प्रकरण धक्कादायक वळणे घेत आहे. आता पूजाचा लॅपटॉप भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांच्याकडे असल्याचा पुणेपोलिसांना संशय आहे. याचमुळे घोगरे यांना पुणे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांच्याकडे पूजाचा लॅपटॉप आणि मोबाईल असल्याची चर्चा आहे. याच पुराव्याच्या जोरावर भाजपकडून पूजा चव्हाण प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली जात असल्याचे देखील बोलले जात आहे. आता मात्र घोगरे यांच्याकडे पूजाचा लॅपटॉप असल्याचा थेट संशय पुणे पोलिसांना आहे. याचमुळे पुणे पोलिसांना पोलिसांना पूजाचा लॅपटॉप आणून द्या अशी मागणी नोटीसद्वारे पोलिसांनी केली आहे.
मृत पूजा चव्हाणचा कोणताही लॅपटॉप किंवा मोबाईल माझ्याकडे नाही. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही, असे भाजपा नगरसेवक धनराज घोगरे यांनी स्पष्ट केले आहे. घोगरे यांच्याविरोधात बीडमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर घोगरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले होते.
वानवडी येथे पूजा चव्हाणचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला. त्यावेळी नगरसेवक घोगरे घटनास्थळी उपस्थित होते. घोगरे यांनी सांगितले की, वानवडी परिसरात इमारतीवरून उडी मारून तरुणीने आत्महत्या केल्याने मला कळाले तसा लोकप्रतिनिधी या नात्याने मी तातडीने त्या ठिकाणी पोहोचलो होतो. तिला उचलून मी रिक्षात ठेवले. आणि पोलिसांना पहिला फोन मीच केला. तिचा मोबाईल आणि लॅपटॉप मला माहित नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व गोष्टी ताब्यात घेतल्या असेही घॊगरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.