पुणे : मुळशी धरणाचे पाणी वीज तयार करण्यासाठी वापरले जात आहे. मात्र, वीज कोळसा, वारा, सौरऊर्जा या कशापासूनही बनविता येईल. टाटाकडून जेवढी वीज तयार केली जाते, तेवढी वीज त्यांना शासनाने द्यावी व मुळशी धरणाचे पाणी पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी आणावे, अशी मागणी राज्याचे माजी जलसंपदा व ऊर्जामंत्री अजित पवार यांनी गुरुवारी केली.महापालिकेच्या वतीने मुंढवा-केशवनगर येथे उभारण्यात आलेल्या जॅकवेल प्रकल्पाचे पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. साडेसहा टीएमसी सांडपाण्यावर प्रक्रिया करून, ते शेतीसाठी उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आजपासून कार्यान्वित झाला. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर दत्तात्रय धनकवडे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार शिवाजीराव आढळराव, खासदार वंदना चव्हाण, आमदार योगेश टिळेकर उपस्थित होते.भामा आसखेड धरणामधून अडीच टीएमसी पाणी नगर रस्ता परिसरासाठी देण्यास मंजुरी दिली आहे. जायका प्रकल्पातून सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांची शहरामध्ये उभारणी झाल्यास चांगले पाणी शेतीसाठी उपलब्ध होऊ शकेल, असे पवार यांनी स्पष्ट केले.विजय शिवतारे म्हणाले, ‘‘पुणे शहराची पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांच्या वाट्याचे पाणी कमी करून, ते पुण्याला दिले जात आहे, त्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याची गरज आहे. मुंढवा जॅकवेलमधून पाणी उचलून ते बेबी कॅनॉलमध्ये टाकले जाणार आहे. बेबी कॅनॉल अनेक वर्षांपासून बंद होते, त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही तातडीने १६ कोटी रुपये मंजूर केले आहे.’’ शिवाजीराव आढळराव म्हणाले, ‘‘मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून नदीतून वाहणारे सांडपाणी उचलून ते शेतीसाठी दिले जात आहे. त्याचा पिण्यासाठी किंवा जनावरांसाठी वापर करता येणार नाहीच; मात्र किमान ते शेतीयोग्य तरी असेल, याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे’’ दत्तात्रय धनकवडे यांनी प्रास्ताविक केले, तर स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कमळाच्या ८ आमदारांनी एवढे करावेचभामा आसखेडमधून शहराला अडीच टीएमसी पाणी देण्याच्या बदल्यात शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा १७५ कोटी रुपयांचा भार पुणे महापालिकेवर टाकण्यात आलेला आहे; मात्र हा खर्च महापालिकेकडून न घेता राज्य शासनाने उचलणे आवश्यक आहे. शहरातून सर्व आठच्या आठ कमळाचे आमदार निवडून आले आहेत, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा विषय लावून धरून महापालिकेवरचा हा बोजा कमी करावा, असे आवाहन अजित पवार यांनी या वेळी बोलताना केले.
मुळशीचे पाणी पुणे-पिंपरीसाठी आणावे
By admin | Published: October 02, 2015 12:45 AM