रावेत : भामरागडसारख्या परिसरात आदिवासींसह अनेक समाज विविध मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. त्या समाजाला त्यांच्या गरजा पुरवून जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य म्हणजेच खरी समाजसेवा आहे. आपल्याकडे सर्व संपत्ती असून, आपल्या तक्रारी संपत नाहीत; पण आदिवासी बांधवांकडे काही नसताना ते कधी तक्रार करीत नाहीत, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी केले. संस्कार प्रतिष्ठानाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय श्री स्वामी विवेकानंद जीवनगौरव पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांना मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आमटे म्हणाले, ‘‘आयुष्यात साहस गरजेचे आहे. नाहीतर आयुष्य मिळमिळीत होते. आता भारत महासत्ता होतो आहे, असे म्हणतानाही विषमता कायम आहे. ४० टक्के आदिवासी दारिद्र्यरेषेखाली आहेत. त्यांचा विचार आपण करायलाच हवा.’’ डॉ. शांताराम कारंडे, सतीश पाटील, अरुण बोऱ्हाडे, करुणा चिंचवडे, रवींद्र चव्हाण, दीपक शेलार, सुवर्णा शिंदे, गणेश कदम, प्रशांत हंबर, विनोद पवार, राजेंद्र वाघ, डॉ. किरण जोशी, जगन्नाथ शिंदे, प्रसन्ना पदमवार, बालशाहीर चैतन्य काजुळकर यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. डॉ. मोहन गायकवाड यांनी प्रास्ताविक केले, तर शोभा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
वंचितांना मुख्य प्रवाहात आणावे : आमटे
By admin | Published: January 09, 2017 3:24 AM