भूगाव : मुळशी तालुक्यात कोळवण ते हडशीदरम्यानच्या वाळकी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचा मुख्य आधार असलेला खांब दोन दिवसांपूर्वी पडला होता. त्यामुळे वाहतुकीसाठी हा धोकादायक झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन तातडीने या पुलाचे काम सुरू केले.या पुलाच्या मधोमध एक दगडी खांब होता. हा खांब जीर्ण झाल्याने दोन दिवसांपूर्वीच अचानक ढासळला. या पुलावरून डांबरीकरण केल्यामुळे तो सुस्थितीत आहे असे वाटत होते; परंतु या पुलावरून एखादे जड वाहन जाऊन अपघात होऊन जीवितहानी झाली असती. हडशीच्या बंधाऱ्यातून शेतीसाठी वाळकी नदीमध्ये पाणी सोडले जाते. पाण्याच्या दबावामुळे पूलच जमीनदोस्त होऊ शकतो म्हणून यातून पाणी सोडणे बंद केले आहे. त्यामुळे सुमारे १७ गावे- वाड्यातील पिके जळुण जाण्याची भीती आहे. हा खांब पडल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर, पंचायत समिती सदस्य सचिन साठे, नामदेव टेमघरे, सरपंच काळुराम आखाडे,उपसरपंच सविता कालेकर, लहु जायगुडे, ज्ञानेश्वर डफळ, भाऊ हुलावळे, सचिन खैरे, संभाजी कालेकर व आणखी काही ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन उपाययोजना करावी, असे निवेदन दिले होते. संबंधित प्रशासनाने दखल घेऊन पुलाला पयार्यी मार्ग काढला व पूल पाडण्याचे काम चालू आहे. या पुलाचे काम लवकरात लवकर होईल, असे सा. बां. उपविभागाचे उपअभियंता ए. जी. शिंदे यांनी सांगितले. (वार्ताहर)
ब्रिटिशकालीन पुलाचा ‘आधार’ कोसळला
By admin | Published: April 28, 2017 5:49 AM