पुणे : नदीपात्रातून जाणाऱ्या मेट्रो मार्गाचा एक खांब तोडण्याची कारवाई दुपारी करण्यात आली. काँक्रीटच्या दर्जाबाबत शंका निमाण झाल्यामुळे हा खांब तोडण्यात आला, असा दावा मेट्रो कंपनीच्या वतीने करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या संदर्भात लगेचच महामेट्रो कंपनीला पत्र पाठवून कामात या पद्धतीने ढिसाळपणा करू नका, असा इशाराही देण्यात आला आहे. थर्ड पार्टी इन्स्पेक्शनमध्ये (स्वतंत्र यंत्रणेकडून होत असलेली कामाच्या दर्जाबाबतची तपासणी) ही बाब आढळल्याची माहिती मिळाली.काही महिन्यांपासून मेट्रोच्या कामाला वेग आला आहे. वनाझ ते रामवाडी या मार्गाचे महापालिकेपर्यंतचे काम जोरात सुरू आहे. या मार्गात नदीपात्र येते. त्यात एकूण ५९ खांब आहेत. त्यांतील काही खांबांचे स्टील वर्क (लोखंडी सळयांचा सांगाडा) पूर्ण झाले असून, त्यात काँक्रीट ओतण्यास सुरुवात झाली आहे.ठेकेदार कंपनी करीत असलेल्या या सर्व कामाचे थर्ड पार्टी इन्स्पेकशन होत असते. त्यामध्ये कामाच्या दर्जासंबंधीचे सर्व निकष काटेकोरपणे तपासले जातात. त्यात एका खांबात टाकण्यात आलेल्या काँक्रीटच्या दर्जाविषयी शंका निर्माण झाल्याने ठेकेदार कंपनीला ते काँक्रीट तोडून नव्याने टाकण्यास सांगण्यात आल्याची माहिती मेट्रो कंपनीतील वरिष्ठ अधिकाºयांकडून देण्यात आली.महत्त्वाच्या कामात ढिसाळपणा करू नयेगुरुवारी दुपारीच जेसीबी यंत्र लावून या खांबातील काँक्रीट तोडण्यात आले. त्यामुळे तिथे नागरिकांची गर्दी झाली होती. मेट्रोच्या कामाबाबत शहरात अनेकांना उत्सुकता आहे. त्यातही नदीपात्रात सुरू असलेले काम पाहण्यास सतत गर्दी होत असते.काही राजकीय पक्षही या कामावर लक्ष ठेवून असते. त्यांच्यातील मनसेच्या वतीने शहराध्यक्ष अजय शिंदे, विभागाध्यक्ष प्रशांत मते यांनी महामेट्रो कंपनीला लगेचच एक पत्र दिले. मेट्रोसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या कामात असा ढिसाळपणा करू नये, असा इशारा त्यात देण्यात आला आहे.
मेट्रोचा एक खांब तोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 5:31 AM