पुणे : अंतर्गत वाद आणि कुरबुरी मिटवून पुण्यासाठी एकत्रितपणे काम करा, अशी समज थेट मुख्यमंत्र्यांनीच दिल्यामुळे पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय काकडे एकत्र आले आहेत. धायरी येथील एका कार्यक्रमात बापट आणि काकडे एकत्र आले होते. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर भारतीय जनता पक्षामध्ये बापट आणि काकडे यांचा वाद निर्माण झाल्याची चर्चा होती. त्याला कारण काकडे यांनी काही नगरसेवकांचे प्रवेश घडवून आणले होते.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापट आणि काकडे या दोघांशीही बंदिस्त चर्चा केली. पुणे महापालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. दोघांनीही आपापल्या क्षमतांचा जास्तीत जास्त वापर करून भारतीय जनता पक्षाला निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले. या दिलजमाईचे प्रत्यंतर गुरुवारीच धायरी येथील एका कार्यक्रमात आले. धायरी येथील अतुल चाकणकर यांच्यामार्फत विविध योजनांच्या शुभारंभप्रसंगी दोघेही आवर्जून उपस्थित होते. (वार्ताहर)
भाऊ-नाना पुण्यासाठी एकत्र
By admin | Published: December 23, 2016 1:08 AM