पुणे : कर्जाचे ओझं हलके करण्यासाठी सख्ख्या भावाच्या घरी चोरी करण्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनने हा प्रकार उघडकीस आणला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोंढवा खुर्द येथील मोसीन शफी शेख यांच्या घरी चोरी झाली होती. त्यांचे घर बंद असताना १५ मे २०१९ ते १ जून २०१९च्या दरम्यान बनावट चवीने घर उघडून आतील बनावट चवीच्या साहाय्याने ड्रॉव्हरमधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून दोन लाख अकरा हजार रुपयांचा माल चोरून नेला होता.
याबाबत तपास सुरु असताना पोलीस कर्मचारू विल्सन डिसुझा यांना खबऱ्यामार्फत फिर्यादीचा भाऊ आरिफ शेख (वय ३६, राहणार कोंढवा खुर्द)हा चोरी केलेले दागिने विकण्यासाठी कॅम्पमधील कोळसे गल्ली भागात येणार आहे. तेथे सापळा लावून संशयित आरिफ याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी विचारपूस करूनही आरिफ याने कोणतीही माहिती दिली नाही. अखेर त्याला लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले. तिथे प्रथम वर्ग न्यायदंड अधिकाऱ्यांनी त्याला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. या दरम्यान पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात त्याने चोरीची कबुली दिली. बरेच कर्ज झाल्यामुळे भावाच्या घरी चोरी केल्याचे त्याने सांगितले. त्याच्या ताब्यातून दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपीने अशा पद्धतीने बनावट चावीने इतर ठिकाणीही चोरी केल्याचा संशय आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, उप निरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, विलास डिसोझा, सचिन गायकवाड यांनी केली.