पुणे - स्वातंत्र्यलढ्याचे साक्षीदार ठरलेले, समाजवादी विचारांनी मूल्यधिष्ठित राजकारण आणि समाजकारणाची मोट बांधणारे, कामगार चळवळीला प्रोत्साहन देणारे, पुरोगामी महाराष्ट्राचा आधारस्तंभ असणारे आणि तरूणाईमध्येही तितक्याच मनमिळाऊपणाने समरसून जाणारे ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्यावर शासकीय इतमामात मंगळवारी वैकुंठस्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. आयुष्याच्या शेवटापर्यंत सतत हसतमुख आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रासह तळागाळातील कार्यकर्त्यांना विचारांचे लेणे बहाल करणाऱ्या लाडक्या भार्इंना ‘भाई वैद्य अमर रहे’, ‘भाई वैद्य जिंदाबाद’, ‘तुम्हारी सपनोंको मंझिल तक पहुंचाऐंगे’च्या घोषणांमधून सर्वांनी साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला.वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यापूर्वी पोलीस दलाच्या घोषपथकाने भाई वैद्य यांना बंदुकीच्या तीन फैºया झाडून मानवंदना दिली. तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यांमधून अश्रूचे झरे पाझरत होते. भाई आपल्याला पुन्हा दिसणार नाहीत, ही जाणीवच प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेली.ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य यांच्या निधनाचे सोमवारी वृत्त समजताच देशभरातील कानाकोपºयातून राष्ट्र सेवा दल, समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि तरूणाईची पावले मंगळवारी सकाळी राष्ट्र सेवा दलाकडे वळली. भाई वैद्य यांचे पार्थिव राष्ट्र सेवा दलामध्ये ठेवण्यात आले होते. या वेळी राजकारणातील कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंत थोपटे, बाळासाहेब थोरात, मंत्रीमंडळातील पहिले मंत्री बी. जी. खताळ-पाटील, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मधुकर निरफराके, कामगार नेत्या मुक्ता मनोहर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, डॉ. शां. ब. मुजुमदार, सुभाष वारे, कामगार नेत्या मुक्ता मनोहर, डॉ. राम ताकवले, यांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. बंदुकीच्या फैरी झाडून भाई वैद्य यांना अभिवादन केल्यानंतर तिरंगी ध्वज काढून घेण्यात आला. त्यावेळी अनेक कार्यकर्ते गहिवरले. ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पानवे’ ही प्रार्थना समूहस्वरांत म्हणत राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी भार्इंना सलामी दिली.समाजवादी विचारसरणीचे मानचिन्हभाई वैद्य म्हणजे समाजवादी विचारसरणीचे मानचिन्ह होते, अशा शब्दांत माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी श्रद्धाजली अर्पण केली. त्यांचे स्वच्छ चारित्र्य, त्यागाची भावना, समाजवादावरील अढळ निष्ठा आणि ध्येयपूर्तीसाठी पडेल ते श्रम करण्याचा करारीपणा त्यांच्यामध्ये अखेरपर्यंत धगधगत होता. त्यांची जीवनयात्रा ही एका कर्मयोग्याची जीवनगाथा म्हणून भावी पिढी लक्षात ठेवेल, असेही पाटील यांनी सांगितले.आज सर्वपक्षीय श्रद्धांजली सभाज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बुधवारी (४ एप्रिल) सर्वपक्षीय सभेचे आयोजन करण्यात आले आहे. साने गुरुजी स्मारक येथील रावसाहेब पटवर्धन विद्याालयाच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे.
भाई वैद्य अमर रहे...: साश्रू नयनांनी भार्इंना अखेरचा निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 3:08 AM