शेलपिंपळगाव: खेड तालुक्यात शेतकरी कुटुंबातील होमगार्ड पथकात कार्यरत असणाऱ्या बावीस वर्षीय तरुणाला कावीळ या आजाराने ग्रासले होते. मात्र काही दिवसातच आजाराने गंभीर रूप धारण केले. तरुणाला उपचारासाठी पिंपरी चिंचवडमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संबंधित डॉक्टरांनी त्याची किडनी व यकृत खराब झाल्याचे सांगून तात्काळ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी बहीण यकृत दान करण्यास तयार झाली. २ जूनला यशस्वी शस्त्रक्रियाही पार पडली. मात्र अखेर गुरुवारी रात्री भावाची प्राणज्योत मालवली. कुणाल दिलीप पावडे असे तरुणाचे नाव आहे.
दरम्यान कुणालच्या निधनाची बातमी संपूर्ण खेड तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली अन सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाऊ लागली. विशेष म्हणजे कुणालच्या बहिणीने स्वतःचे यकृत भावासाठी दान केले होते.
संबंधित डॉक्टरांनी किडनी व यकृत खराब झाल्याचे सांगून तात्काळ यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने १५ ते २० लाख रुपयांचा अपेक्षित खर्च सांगितला. वास्तविक कुणालच्या घरची आर्थिक परिस्थिती एकदम हलाकीची असल्याने हा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. मात्र गावातील तरुणांनी, मित्रांनी, गावकऱ्यांनी तसेच कुटुंबातील सदस्यांनी कुणालच्या उपचारासाठी सोशल मीडियावर मदतीची साद घातली. त्यातून समाजातील असंख्य मदतीचे हात येऊन ९ ते १० लाख रुपयांची मदत गोळा करण्यात आली होती.
दरम्यान त्याच्या दोन बहिणींपैकी रेणुका महिंद्रा शिंदे हिने आपल्या भावाला यकृत दान केले होते. २ जुनला पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली होती. यकृत प्रत्यारोपणानंतर बहीण रेणुका सुखरूप आहे. मात्र कुणाल शस्त्रक्रियेनंतर शुद्धीवर आला नव्हता. अखेर गुरुवारी रात्री त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेला १८ तास उलटूनही मृतदेह ताब्यात नाही
गरीब कुटुंबातील कुणालचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्री ९ वाजता रुबी हॉल रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या घटनेला १८ तास उलटून गेले आहेत. मात्र अद्यापही कुणालचा मृतदेह रुग्णालयाने त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिलेला नाही. 'अगोदर रुग्णालयाचे शिल्लक साडेचार लाख रुपयांचे बिल भरा, तरच मृतदेह ताब्यात देऊ अशी भूमिका रुग्णालयाने घेतल्याचे समजते. तर आजपर्यंत १२ लाख ५० हजार रुपये रुग्णालयात भरले असल्याचे कुणालच्या कुटूंबियांनी सांगितले. मृत्यूनंतरही कुणालची परवड सुरू आहे.