इंदापूर : तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कारणांमधून भाऊंचा सहवास लाभला आहे. आमदार, राज्यमंत्री, महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री म्हणून आणि पालकमंत्री तसेच खासदार म्हणून त्यांनी केलेले कार्य आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेल्यानंतर त्या पिढीतील लोक त्यांच्या कार्याचे गौरउद्गार काढतात. भाऊंनी नि:स्वार्थीपणाने सामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून कार्य केले, असे प्रतिपादन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
माजी खासदार कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या १५ व्या पुण्यतिथीनिमित्त इंदापूर महाविद्यालयातील समाधिस्थळाचे हर्षवर्धन पाटील यांनी दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. या वेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन आप्पासाहेब जगदाळे, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, संस्थेचे खजिनदार ॲड. मनोहर चौधरी, सहसचिव प्रा. बाळासाहेब खटके, संचालक विलासराव वाघमोडे, आबा पाटील, पांडुरंग पाटील, माजी नगरसेवक शेखर पाटील, विष्णू मोरे उपस्थित होते. अभिवादनप्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील बोलत होते.
पुढे बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, अनेक सहकारी संस्था स्थापन करून सर्वसामान्यांचा विकास भाऊंनी केला आहे. इंदापूर महाविद्यालयात कम्युनिटी रेडिओ उभारणीचे काम प्रगतिपथावर असून इंदापूरकरांना लवकरच रेडिओ (एफएम ९०.४) ऐकण्याची संधी मिळणार आहे. अनेक शैक्षणिक संस्थांचे कार्य प्रगतिपथावर आहे.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने भाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान प्रश्नमंजूषा घेण्यात आली होती. यामध्ये ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी मानले. उपस्थित कर्मयोगी परिवाराने भाऊंच्या समाधिस्थळाचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले.