पुणे : देशासाठी लढताना आलेले अपंगत्व, कुटुंबीयांपासून आणि सण- उत्सवांपासून दूर असलेले सैनिक आणि समाजसेवेचे व्रत घेतलेल्या सामाजिक संस्था व गणेशोत्सव मंडळांनी प्रेरणादायी वातावरणात अपंग सैनिकांसमवेत भाऊबीजेचा आनंद लुटला.निमित्त होते बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट आणि सैनिक मित्र परिवारातर्फे खडकी येथील अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रातील सैनिकांसाठी आयोजित साहित्यिकांसोबत भाऊबीज या कार्यक्रमाचे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. वीणा देव यांनी सैनिकांना औक्षण करुन त्यांच्याशी संवाद साधला. केंद्राचे प्रमुख कर्नल डॉ. पी. आर. मुखर्जी, ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शहा, सैनिक मित्र परिवाराचे अशोक मेहंदळे, दिलीप गिरमकर, गिरीश देशपांडे, नरेंद्र व्यास, अमित दासानी, अमर हिरेशिखर, संकेत निंबाळकर, सुनील फाटक, अरविंद पारखी, मीनाक्षी दुसाने, स्वाती रजपूत, राजेंद्र बर्वे, स्वाती ओतारी, विद्या घाणेकर, रेणुका शर्मा, गंधाली शहा, निराली लातूरकर आदी उपस्थित होते.वीणा देव म्हणाल्या, ‘‘आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दु:खे असतात. परंतु आपले सैनिक आपल्यासाठी जे सहन करतात, त्याच्या तुलनेत आपल्या दु:खाचे मोल काहीही नसते. देशाच्या सीमेवर अहोरात्र आपले रक्षण करणाऱ्या सैनिकांकडे पाहूनच आपले बनोेबल वाढत असते.’’डॉ. मुखर्जी म्हणाले, ‘‘अपंगत्व आल्यानंतर सैनिकांचे पुढील आयुष्य अवघड असते. त्यामुळे सैनिकांसमवेत सण-उत्सव साजरे केल्याने त्यांचे मनोबल वाढते. अपंगत्व आले तरीही प्रत्येक सैनिकामधील सकारात्मकता मोठी असते. कोणत्याही संकटाला ते धैर्याने सामोरे जातात. केवळ सैनिकच देशसेवा करतात असे नाही तर देशातील प्रत्येक जण आपल्यापरीने आपल्या क्षेत्रात योगदान देऊन देशसेवाच करीत असतो.’’ आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
अपंग सैनिकांसमवेत भाऊबीज
By admin | Published: November 16, 2015 1:58 AM