लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिकेतर्फे निगडी-दापोडी दरम्यान पुणे-मुंबई महामार्गावर बीआरटीएस मार्ग उभारला आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. असे असतानाही इतक्या वर्षांत हा मार्ग सुरू झालेला नाही. त्यामुळे हा मार्ग म्हणजे बिमारू रोड ट्रान्सपोर्ट सर्व्हिस झाला आहे. अधिकाऱ्यांची उदासीनता आणि भ्रष्ट कारभारामुळे बीआरटीएसची ही मार्गिका सुरू करण्यास सातत्याने विलंब होत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे निगडी-दापोडीदरम्यान पुणे-मुंबई महामार्गावर बस रॅपिड ट्रान्झीट सिस्टम अर्थात बीआरटीएस मार्गिका उभारली आहे; मात्र काही वर्षांपासून या मार्गाला सातत्याने विलंब होत आहे. तांत्रिक त्रुटी पुढे करून महापालिकेचे संबंधित अधिकारी वेळ मारून नेत आहेत. यातून केवळ काही ठेकेदारांचे हित साधण्याचा प्रयत्न होत आहे. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या मार्गाच्या कामात अनेक त्रुटी दाखवत आणि या मार्गाच्या कामाला विलंब करत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. परिणामी या मार्गाचे काम अपूर्णावस्थेत आहे. बीआरटीमुळे निगडी-दापोडी या मार्गावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. ग्रेड सेपरेटरसाठीचे इनमर्ज आणि आऊटमर्ज या बीआरटीएससाठी सातत्याने बदलण्यात येत आहेत. त्यामुळे या मार्गावरील सेवा रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढली. बीआरटीएस मार्ग खुला न झाल्याने पीएमपीएमएल बसही सेवा रस्त्यांवरूनच धावतात. त्यामुळे सेवा रस्त्यांवरील वाहनांमध्ये अधिकच भर पडते. परिणामी सेवा रस्त्यावर सातत्याने वाहतूककोंडी होते. सिग्नलला वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे वाहनांचा खोळंबा होऊन शहराच्या प्रदूषणात वाढ होत आहे. वाहतुकीचे नियोजन ढासळल्याने अपघात होत आहेत.मेट्रोच्या कामाने वाहतुकीचा खोळंबा पुणे-मुंबई महामार्गावर वल्लभनगर येथे मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे वल्लभनगर येथे महामार्गावर या कामासाठी अर्धा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. केवळ एक पदरी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. परिणामी येथे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे बहुतांश वाहनचालक वल्लभनगर येथील सेवा रस्त्याचा वापर करीत आहेत. परिणामी सेवा रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यातच बीआरटीएस मार्गिका अद्याप सुरू न झाल्याने बससाठीही सेवा रस्त्याचाच वापर सुरू आहे. त्यामुळे सेवा रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून पाचपट दंड वसूल करावा, अशी मागणी भाजपाचे शहर - जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.
बीआरटी बनली ‘बिमारू’
By admin | Published: July 08, 2017 2:27 AM