पुणे: शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत असतानाच त्यावर महापालिकेकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसून येत नाही. दररोज पुणेकर वाहतूककोंडीत अडकतात आणि त्याचे खापर वाहतूक पोलिसांवर फोडतात. त्यामुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र लिहून बीआरटी मार्ग बंद करा, अशी विनंती केली. त्यानंतर पीएमपीएमएल प्रशासनानेदेखील मनपा आयुक्तांना पत्र लिहून बीआरटी मार्ग बंद न करता वाहतूक नियमन योग्य पद्धतीने झाले आणि वाहनांच्या पार्किंगची सुविधा केली तर हा प्रश्न काही प्रमाणात सुटेल असे सांगण्यात आले आहे.
पुणे शहराप्रमाणे पिंपरी-चिंडवड येथेदेखील बीआरटी मार्ग अस्तित्वात आहे. मात्र, तेथे वाहतूककोंडी होत नाही, मग पुण्यातील बीआरटी प्रकल्प फसला का ? असा प्रश्न उपस्थित होतो. यावर पीएमपी अधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड येथे सुरू असलेला बीआरटी मार्ग हा योग्य पद्धतीने बांधण्यात आला असल्याने तेथे ही समस्या उद्भवत नाही. पुण्यात मात्र अनेक ठिकाणी बीआरटी मार्गावर अडथळे असल्याने थोडी समस्या निर्माण होत असल्याचे सांगितले. पिंपरी- चिंचवड प्रमाणे कात्रज ते स्वारगेट मार्गावरील बीआरटी मार्ग व्यवस्थित कार्यान्वित असतो. उर्वरित पुण्यातील बीआरटी मार्गावर मात्र सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे अडथळा निर्माण होत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
बीआरटीमधून स्कूलबस चालवा
पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांच्याशी ‘लोकमत’ने याविषयी संवाद साधला असता, त्यांनी आम्हीदेखील मनपा आयुक्तांना बीआरटी सुरू ठेवण्यासंदर्भात पत्र दिले असून, प्रवाशांना पीएमपीची जलद सेवा द्यायची असेल तर बीआरटी मार्ग सुरू ठेवायलाच हवेत. पण ट्रॅफिकचा विचार करता बीआरटी मार्गातून एसटी बस, स्कूलबस आणि अत्यावश्यक सेवेतील वाहने सुरू करण्यास काही अडचणी नाही, ही भूमिका कळवली असल्याचे सांगितले.