पुणे : एप्रिल २०२२ मध्ये एकवीरा देवीच्या यात्रेत किरकोळ वादातून चार जणांनी मिळून एका तरुणाचा निर्घृण खून केला होता. त्या प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांनी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. अजय प्रवीण पाटील आणि समाधान डी. पाटील, असे जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणात मनोज पाटील याचा नाहक बळी गेला. सर्व आरोपी हे रायगड जिल्ह्यातून एकवीरा देवीच्या यात्रेसाठी आले होते. मनोज पाटील व त्याचे इतर मित्र हे सुद्धा एकवीरा देवीच्या यात्रेसाठी ठाणे जिल्ह्यातून आले होते. गर्दीत फिर्यादीच्या मित्राचा मोबाइल चोरीला गेला असता त्यांनी आरोपींकडे विचारणा केली. त्यावरून दोन्ही गटांत वादावादी सुरू झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपींनी मनोज पाटील याच्या छातीत गुप्ती खुपसून त्याला गंभीर जखमी केले. हे पाहून फिर्यादी व त्याचे इतर मित्र तेथून पळून गेले. लोणावळा पोलिस ठाण्यामध्ये आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली.
आरोपी अजय पाटील आणि समाधान पाटील यांनी ॲड. शुभांगी परुळेकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. ही घटनाही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी पाहिली आहे, तसेच आरोपीकडून रक्ताने माखलेली हत्यारे जप्त केलेली आहेत. फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपींना ओळखपरेडमध्ये ओळखले आहे, या आणि अन्य कारणास्तव आरोपीला जामीन देण्यात येऊ नये, असा जोरदार युक्तिवाद सरकार पक्षाने केला होता. ॲड. परुळेकर यांनी उच्च न्यायालयात आरोपीची बाजू मांडताना, अजय पाटील आणि समाधान पाटील यांचा गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग दिसून येत नाही. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबात विसंगती आहे, तसेच ओळख परेड ही नियमांचे पालन न करता घेतली गेली आहे, अशा महत्त्वाच्या बाबींकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. हा युक्तिवाद ग्राह्य धरून उच्च न्यायालयाने आरोपीला सोडण्याचा आदेश दिला.