कामशेत : मावळ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यावेळी कामशेत पोलिसांनी तपासाची सूत्रे जलद गतीने हलवत २४ तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी मंगळवार (दि.२) कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २) दुपारी ३:३० च्या सुमारास कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कामशेत पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलवत २४ तासाच्या आत आरोपी तेजस उर्फ दादा महिपती दळवी (वय २४) याला मोठ्या शिताफीने अटक केली. आरोपी तेजसने गुन्हा कबूल केला असून, त्याच्यावर पोस्को, ३६३, ३०२ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप करत आहेत.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी दुर्गा श्वानाचा वापर शोध मोहिमेत करण्यात आला.
या गुन्ह्याच्या शोधामध्ये पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहायक पोलीस निरीक्षक आकाश पवार, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, गणेश तावरे, सहायक फौजदार प्रकाश वाघमारे, शब्बीर पठाण, पोलीस हवालदार हनुमंत पासलकर, प्रमोद नवले, समाधान नाईकनवरे प्राण येवले, समीर शेख, जितेंद्र दीक्षित, सागर बनसोडे, अनिल हिप्परकर, नितीन कळसाईत, आशिष झगडे, रवींद्र राऊळ, होमगार्ड प्रशांत कटके, किसन बोंबले आदींच्या पथकाने भाग घेतला होता.