पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये चालू शैक्षणिक वर्षापासून बीएस्सी बीएड हा चार वर्षांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाचणार आहे. गणित आणि विज्ञान या विषयांतील जागतिक दर्जाचे शिक्षक घडविण्यासाठी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र व विस्तार विभागाकडून प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. बीएस्सी बीएड या अभ्यासक्रमात प्रवेशासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मागील वर्षीपासून बीएड हा अभ्यासक्रम एक वर्षाऐवजी दोन वर्षांचा करण्यात आला. मात्र, पुणे विद्यापीठाने बीएस्सी पदवीशीच हा अभ्यासक्रम जोडल्याने एकूण चार वर्षांचा अभ्यासक्रम राहील. या अभ्यासक्रमासाठी जर्मनीतील जॉटिंगन विद्यापीठाचे सहकार्य मिळणार आहे. हा अभ्यासक्रम एनसीईआरटी मान्यताप्राप्त असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे. तसेच, या अभ्यासक्रमानंतर विद्यार्थ्यांना एम. एस्सी. किंवा एम. एड. या अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेता येईल, असे विद्यापीठाने कळविले आहे. तसेच बारावीत खुल्यागटासाठी ५० टक्के, तर राखीव गटांसाठी ४५ टक्के गुण असणे आवश्यक आहे. केवळ गणित, पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र विषयांसाठीच हा अभ्यासक्रम असणार आहे.
विद्यापीठात यंदापासून बीएस्सी बीएड
By admin | Published: June 18, 2016 3:23 AM