पुणे : बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय पदवी अभ्यासक्रमाच्या काही विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पुन्हा एकदा पेपरफुटीचे वादळ घोंघावू लागले आहे. परीक्षा विभागाने मात्र पेपर फुटला नसल्याचे स्पष्ट केले आहे.विद्यापीठामार्फत काही दिवसांपासून विविध अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षा घेतल्या जात आहेत. मात्र मागील काही दिवसांत द्वितीय व तृतीय वर्ष बीएस्सीच्या काही विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच मोबाईलवर व्हायरल झाल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. शनिवारीही तृतीय वर्षाची ‘आॅब्जेक्ट ओरिएन्टेड सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग’ या विषयाची प्रश्नपत्रिका २० मिनिटे आधीच व्हायरल झाली. दुपारी २ ते ४ या वेळेत ४० गुणांची परीक्षा झाली. तसेच बुधवारी इंटरनेट प्रोग्रामिंग तर शुक्रवारी प्रोग्रामिंग इन जावा विषयाची प्रश्नपत्रिका व्हायरल झाली. शनिवारीही या विषयाची प्रश्नपत्रिका व्हायरल झालाचादावा विद्यार्थ्यांनी केला आहे. परीक्षेपूर्वी एक तासभर आधीपरीक्षा विभागाकडून संबंधितपरीक्षा केंद्रांना ई-मेलद्वारे प्रश्नपत्रिका पाठविल्या जातात. परीक्षेच्याकाही मिनिटे आधी प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून त्याच्या प्रिंट घेतल्या जातात. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकांचे वाटप केले जाते.मात्र, प्रश्नपत्रिका डाऊनलोड झाल्यानंतर त्याचे मोबाईलवर छायाचित्र घेऊन विद्यार्थ्यांना दिल्या जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने याप्रकरणी परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांसह प्रशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून निलंबन करावे, अशी मागणी विद्यापीठाकडे केली आहे. बीएस्सी पेपर व्हॉट्सअॅपवरून व्हायरल होत असल्याने परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार सातत्याने पुढे येत आहे. विभागीय परीक्षा न घेता पदोन्नती प्रक्रिया राबवून विद्यापीठ प्रशासनाकडून परीक्षा विभागामध्येही काही पदे भरली गेली आहेत. या भरतीमुळे अकार्यक्षम कर्मचारी, अधिकारी भरती झाल्याने असे अनुचित प्रकार घडत असल्याचा आरोप मनविसेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केला आहे.विद्यापीठाचा कोणताही पेपर फुटलेला नाही. विद्यापीठाकडून परीक्षा केंद्र असलेल्या महाविद्यालयाला प्रश्नपत्रिका पाठवून दिली जाते. ही प्रश्नपत्रिका महाविद्यालयाकडून डाऊनलोड केली जाते. ही डाऊनलोड होण्याची वेळ व संबंधित महाविद्यालयाचा कोड वॉटरमार्क म्हणून प्रश्नपत्रिकेवर उमटतो. विद्यापीठाच्या माहितीनुसार पेपर फुटलेला नाही. तशी कोणती तक्रारही अद्यापपर्यंत विद्यापीठाकडे आलेली नाही.- परीक्षा विभाग,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
बीएस्सीच्या प्रश्नपत्रिका व्हायरल, विद्यार्थ्यांकडून पेपरफुटीचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 1:35 AM