सोमेश्वरनगर : परिसरात गेल्या ६ दिवसांपासून बीएसएनएलची दूरध्वनी, इंटरनेट सेवा बंद आहे. त्यामुळे ग्राहकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. भारत संचार निगम लि.च्या सोमेश्वर केंद्राची सलग सहा दिवस होऊन गेल्यानंतर बीएसएनएलचे लँडलाईन, ब्रॉडबँड सेवा बंद आहे.हजारो ग्राहकांनी एक्स्चेंजला फोन लावायचा प्रयत्न केला, तर केंद्रच बंद आहे. ट्रायच्या नियमानुसार ग्रामीण भागात सेवांची बंधने इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्याला बंधनकारक आहे. त्यानुसार सर्वांत जास्त सरकारचा वाटा असलेली बीएसएनएल सेवा ग्रामीण भागात फक्त नावापुरती उरलेली दिसत आहे. इतर स्पर्धक कंपन्यांनी आपापले प्लॅन बदलून अधिकाधिक सुविधा दिल्या; मात्र बीएसएनएल सतत घोटाळ्यांनी त्रस्त असते. सोमेश्वर परिसरात तर दर आठ दिवसांना काही ना काही घोटाळा चालूच असतो.बीएसएनएलची सेवा लवकर सुरळीत करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी वर्गाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत. बीएसएनएलबरोबर आयडिया, जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन या कंपन्यांचीही सेवा ग्राहकांना मिळत नसल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षापासून आयडिया आणि जिओ या दोन कंपन्यांची तर सोमेश्वरनगर सोडल्यानंतर दीड किलोमीटरवर पण रेंज येत नाही. या कंपन्या ग्राहकांना फोर जीचे आमिष दाखवून फोर जी नेटवर्कचा मोबदला घेऊन प्रभावी इंटरनेट सुविधा देत नसल्याचे चित्र आहेत.ग्राहकांचे पैसे मातीमोल...सोमेश्वर कारखाना, सोमेश्वर देवस्थान परिसरात, नीरा रेल्वे स्थानक, मोरगाव, शिरूर-सातारा महामार्ग आदी बाबींबरोबरच शैक्षणिक संकुलाने सोमेश्वर परिसरात बीएसएनएलचे ग्राहक वाढले. गेल्या सहा दिवसांत हजारो ग्राहकांनी ब्रॉडबँडपोटी व लँडलाईनपोटी भाडे विनाकारण घालवल्याची तक्रार केली आहे.महिन्याचे भाडे एकदम आकारणारी कंपनी ग्राहकांचे नुकसान कसे भरून देणार, हा प्रश्न आहे. अनेकांनी हे भाडे वसूल करण्यासाठी ग्राहक मंचात जाण्याचा निर्णय घेतला आहे. उदासीन अधिकारी फक्त ‘घोटाळा आहे,’ एवढेच माफक उत्तर देतात. ‘लवकरच निघेल, पुण्याहून टीम आली आहे,’ असे माळेगाव केंद्राचे अधिकारी सांगत आहेत.
बीएसएनएलची सेवा सहा दिवसांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 2:21 AM