पुणे: बहुजन समाज पार्टीच्या वतीने शुक्रवारी, २३ डिसेंबर रोजी नागपूरमधील विधान भवनावर आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. यासाठी पुण्यातून पक्षाचे दोन हजार कार्यकर्ते जाणार आहेत, अशी माहिती बसपचे प्रदेश प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी दिली.
या आक्रोश मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रीय संयोजक आकाश आनंद, प्रदेश प्रभारी डॉ. अशोक सिद्धार्थ, नितीन सिंह, प्रदेशाध्यक्ष ॲड. संदीप ताजने करणार आहेत. भूमिहीन गायरान अतिक्रमित जमीनधारक शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवा बेरोजगार शासकीय-निमशासकीय कर्मचारी यांच्या न्याय्य हक्कांसाठी हा माेर्चा असणार आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, १-२ गुंठेवारी खरेदी-विक्री सुरू करावी, अशा विविध २६ मागण्या केल्या असून त्याचे निवेदन सरकारला देण्यात येणार आहे.
या आक्रोश मोर्चाला सुमारे एक लाख कार्यकर्ते येण्याची शक्यता असल्याचे डॉ. हुलगेश चलवादी यांनी सांगितले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश महासचिव सुदीप जी. गायकवाड, बसप महाराष्ट्र प्रदेश सचिव भाऊसाहेब शिंदे, जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष महंमद शफी, पुणे शहर युवक अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते.