अशोक खरात
खोडद : जुन्नर तालुक्यातील बुद्धलेण्यांनी जुन्नरच्या वैभवात विशेष भर घातली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन होण्यासाठी या बुद्धलेण्या केंद्रबिंदू ठरत आहेत. लेण्यांकडे जाणारे मार्ग व्यवस्थित नसल्याने पर्यटकांना व अभ्यासकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जुन्नर तालुक्यातील या लेण्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची गरज प्रकर्षाने जाणवत आहे.
जुन्नर तालुक्यात मनमुकडा (मानमोडी) डोंगररांगेत भीमाशंकर लेणी समूह, अंबा अंबिका लेणी समूह आणि भूत लेणी समूह असे तीन लेण्यांचे गट आहेत. शिवनेरी किल्ल्यावरदेखील लेणी समूह आहेत. शिवनेरी लेणीवरील स्तूप सर्वाधिक उंच आहे. सोमतवाडीजवळील डोंगररांगेत तुळजा लेणी समूह आहे. कपीचीत (लेण्याद्री) डोंगरातदेखील मोठा लेणी समूह आहे. लेण्याद्रीजवळच असलेल्या डोंगरातदेखील सुलेमान लेणी समूह आहे. प्राचीन नाणे घाटातदेखील लेणी समूह आहे. या सर्व लेणी समूहांमध्ये सुमारे २५० ते ३०० लेण्या असून, वेगवेगळ्या प्रकारचे चैत्य स्तूपदेखील या लेण्यांमध्ये पाहायला मिळतात. या लेण्या पाहण्यासाठी लेणी अभ्यासक व विदेशी पर्यटक सातत्याने जुन्नर तालुक्यात येत आहेत.
जैन आणि बौद्ध संस्कृती ही आपल्या देशातील अत्यंत प्राचीन संस्कृती आहे. या देशातील सर्व बुद्धलेण्या या देशातील सर्वांत प्राचीन वारसा आहे. जुन्नर हे त्यावेळेचे नालंदा, तक्षशिलासारखे मोठे विश्वविद्यालय होते. जगभरातून विद्यार्थी येथे अभ्यासासाठी येत असत. अनेक परदेशी व्यापाऱ्यांनी येथे दान दिल्याचे येथे शिलालेख आहेत. ग्रीक लोकांची जुन्नर ही मोठी वसाहत होती. जुन्नर ही सातवाहनांची राजधानीदेखील जुन्नर होती.
लेणी कोरण्याची कला सुमारे १२०० वर्षे महाराष्ट्रात जोपासली गेली. बुद्धलेण्यांचा उपयोग ध्यानधारणा, धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी केला जात होता. मध्यंतरीच्या कालखंडात अनेक बुद्धलेण्यांमध्ये विद्रुपीकरण करण्यात आले आहे. बौद्ध भिक्षुक हे एक उत्कृष्ट जलसंवर्धक, भूशास्त्रज्ञ आणि पर्यावरण अभ्यासक होते. या लेण्यांच्या माध्यमातून जुन्नर तालुक्यात बुद्ध वारसा आणि ही बुद्ध संस्कृती अभ्यासायला मिळत आहे.
जुन्नरमधील प्रत्येक लेणीमध्ये बुद्ध स्तूप किंवा चैत्य स्तूप पाहायला मिळतो. बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बुद्धांच्या अस्थिधातूंवर स्तूपाची निर्मिती केली गेली. थेरवाद परंपरेत बुद्धांना मूर्ती रूपात न पूजता स्तूपाच्या प्रतीकांत पुजले जायचे. स्तूप म्हणजेच बुद्ध असून लेणीत ज्या ठिकाणी स्तूप असतो, त्या खोलीला चैत्यगृह म्हटले जाते व हेच चैत्यगृह प्रार्थनेचे स्थळ असते. बुद्धांचे शरीर धातू स्तूपात असल्याने त्यांना अनन्यसाधारण महत्त्व होते व हीच बुद्धरूपे म्हणून पुजली जात.
बौद्ध संस्कृतीमध्ये प्रत्येक पौर्णिमेला महत्त्व आहे. बुद्धपौर्णिमेचे आगळेवेगळे आणि मोठे महत्त्व आहे. तथागत बुद्धांचा जन्म, बुद्धांना ज्ञानप्राप्ती आणि बुद्धांचे महापरिनिर्वाण या महत्त्वपूर्ण घटना वैशाख पौर्णिमेच्या दिवशीच म्हणजे आजच्या दिवशी घडल्याने या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
भारतीयांचे ग्रीक संस्कृतीशी नाते आहे, हे आपल्याला लेण्याद्री लेणीमधील शिल्पावरून लक्षात येते. कल्याणचे दोन हजार वर्षांपूर्वीचे नाव कलीयन असल्याचे आपल्याला शिलालेखांतून समजते. कल्याणच्या सोनाराने लेण्याद्री येथील चैत्यगृहाचे दान दिल्याचे शिलालेखांतून आढळते. आपण आपला हा लेण्यांचा इतिहास विसरत चाललो आहोत. जुन्नर तालुक्यातील प्रत्येक लेणी ही विविध व्यापारी व राजांच्या दानातून तयार करण्यात आली आहे.
या लेण्यांकडे जाणारे मार्ग सुरक्षित करून ठिकठिकाणी माहिती फलक आणि दिशादर्शक फलक लावल्यास तसेच येथील आग्यामोहळांच्या मधमाश्यांचे पर्यटकांवर होणारे हल्ले थांबविले तर पर्यटकांना अधिक सोईस्कर होईल.
''जुन्नर तालुक्यातील बुद्धलेण्यांच्या विकासासाठी बुद्धिस्ट सर्किट योजनेच्या माध्यमातून ठोस निधी आणण्यासाठी पाठपुरावा करत आहे. या लेण्यांची माहिती सर्वदूर पोहोचविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. - डॉ. अमोल कोल्हे, खासदार, शिरूर लोकसभा.''