पुणे :रेल्वे प्रवाशांना विविध सुविधा देण्यासाठी आणि अधिक गती देण्याच्या दृष्टीने बजेटमध्ये महाराष्ट्र राज्य रेल्वेला १५ हजार ५५४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पूर्वी फक्त १ हजार १७१ कोटी रुपयांचे बजेट असायचे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात महाराष्ट्रासाठी रेल्वेची विविध विकासकामे करण्यासाठी मोठी तरतूद करीत रेल्वेला गती देण्यात येत आहे. त्यामध्ये रेल्वे प्रवाशांना वंदेभारत स्लीपर, वंदेभारत मेट्रो, हायड्रोजन ट्रेनद्वारे लवकरच प्रवास करता येणार आहे, असे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितले.
अंतरिम अर्थसंकल्प २०२४ जाहीर झाल्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरातील विविध राज्यांतील पत्रकारांशी ऑनलाइन संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी रेल्वे पुणे विभागाच्या मुख्यालयात विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले की, राज्यातील रेल्वे मार्गांचे ९८ टक्के विद्युतीकरण झाले आहे. त्यामुळे प्रदूषण कमी होऊन मोठी इंधन बचत झाली आहे. राज्यात रेल्वेसाठी आत्तापर्यंत ८० हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. ८१६ उड्डाणपूल बनविले आहेत. राज्यातील ११७ रेल्वेस्थानकांवर ‘एक देश एक उत्पन्न’ स्टॉल उभारले आहेत. कवच या सुरक्षा यंत्रणेचे राज्यभरात तीन हजार ५५१ टॉवर बसवले आहेत. त्याअंतर्गत आत्तापर्यंत १७० लोकोमोटिव्हला कवच यंत्रणा बसली, तर एक हजार ३०० स्थानकांचा पुनर्विकास सुरू आहे. ४० हजार डबे अपग्रेड करण्याचे काम सुरू असून, पुश-पूल टेक्नॉलॉजीवर आधारित वंदेभारत गाड्या सुरू केल्या आहेत. आगामी काळात वंदेभारत स्लीपर, वंदेभारत मेट्रो, हायड्रोजन ट्रेन लवकरच येतील. त्याचबरोबर रस्ता सुरक्षा, ग्राहक सुविधा, ट्रॅक नूतनीकरण, विद्युतीकरण प्रकल्प, डबल डायमंड स्लीपर आदी विकासकामे या अर्थसंकल्पातून विकसित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे-लोणावळा, पुणे-दौंडसाठी बनणार अतिरिक्त मार्गिका :
राज्यात ३ कॉरिडॉर (मार्गिका) तयार करण्याचे नियोजन असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. हे कॉरिडॉर ४० हजार किलोमीटर अंतराचे असतील. ते तयार करण्यासाठी ६ ते ८ वर्षे वेळ लागणार आहे. त्यामुळे पुणे-लोणावळा-पुणे मार्गावरील प्रलंबित तिसऱ्या, चौथ्या मार्गिकेचा प्रश्न मार्गी लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, या मार्गावरील रेल्वे गाड्यांची कोंडी सुटणार आहे. तसेच, पुणे-दौंड मार्गावर एनर्जी पदार्थांची वाहतूक करण्यासाठी सुध्दा अतिरिक्त कॉरिडॉर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील एनर्जी पदार्थांची मालवाहतूक वेगाने होणार आहे.