पुुणे : महापालिका आयुक्त सौरभ राव सन २०१९-२० या आर्थिक वर्षांचे अंदाजपत्रक गुरुवारी (दि. १७) स्थायी समितीला सादर करणार आहेत. गेल्या दोन वर्षांत महापालिका अंदाजपत्रकाने तब्बल पाच हजार कोटींचा आकडा पार केला आहे. महापालिकेच्या उत्पन्नाने मात्र अद्याप ४ हजार कोटींचा टप्पा पार केलेला नाही. यंदादेखील प्रशासनाने ५ हजार ९११ कोटींचे उत्पन्न गृहीत धरले असले तरी प्रत्यक्षात मार्चअखेरपर्यंत केवळ ४ हजार ८२ कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल, असा प्रशासनाचाच अंदाज आहे. यामुळे आयुक्त यंदा वास्तवादी अंदाजत्रक सादर करणार का फुगवटा कायम ठेवणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
महापालिका प्रशासनाकडून २0१८-१९ या आर्थिक वर्षासाठी सुमारे ५ हजार ३९७ कोटींचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले होते. यामध्ये सुमारे ४७३ कोटींची वाढ करीत स्थायी समितीने ५ हजार ८७० कोटींचे अंदाजपत्रक मंजूर केले होते. हे अंदाजपत्रक सादर करताना महापालिकेला तब्बल ५ हजार ९११ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे गृहीत धरण्यात आले होते. परंतु उत्पन्नाचा हा आकडा गाठण्यासाठी प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहे.
या अंदाजपत्रकात मिळकतकर, बांधकाम विकास शुल्क तसेच एलबीटी हे उत्पन्नाचे प्रमुख घटक प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत मिळकतकर विभागास ९८५ कोटी, बांधकाम विभागास ५०१ कोटी, तर जीएसटी विभागास १४४६ कोटींचे उत्पन्न मिळालेले आहे. परंतु एकूण उद्दिष्ट आणि आतापर्यंतची वसुली लक्षात घेता यामध्ये २५ ते ३० टक्के घट होण्याची शक्यता प्रशासनानेच व्यक्त केली आहे. महापालिकेच्या एकूण उत्पन्नातील तब्बल ५० टक्के निधी केवळ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च केला जात आहे. तर २५ टक्के खर्च देखभाल दुरुस्तीवर खर्च केला जातो.
यामुळे नवीन विकासकामे घेण्यासाठी महापालिकेला निधीचा मोठा तुटवडा निर्माण होत असून, शहरासाठीच्या नवीन व मोठ्या योजनांची भिस्त शासनाच्या अनुदानावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आयुक्त सौरभ राव आपले पहिले अंदाजपत्रक सादर करताना वास्तवादी अंदाजपत्रक सादर करणार की फुगवटा कायम ठेवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.