पुणे : महापालिकेचे सन २०१६-१७चे अंदाजपत्रक आयुक्त कुणाल कुमार स्थायी समितीला २५ जानेवारीला सादर करणार आहेत. त्यासाठी समितीची विशेष अंदाजपत्रकीय सभा २५ जानेवारीला सकाळी ११ वाजता होत आहे. स्मार्ट सिटीचा प्रस्ताव दिल्लीत प्रलंबित असल्यामुळे त्याची व अंदाजपत्रकाची सांगड आयुक्तांनी कशी घातली असेल, याबाबत पालिका वर्तुळात उत्सुकता आहे.स्थानिक संस्था कर तसेच पालिकेशी संबधित अन्य अनेक आर्थिक गोष्टींबाबत सरकारकडून धरसोडीचे धोरण सुरू असल्यामुळे पालिकेच्या अंदाजपत्रकावर त्याचा परिणाम होत आहे. मागील वर्षात अचानक स्थानिक संस्था कर बंद करण्यात आला. आयटी पार्कला मिळकत करात सवलत देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारले आहे. त्यामुळे मिळकत कराच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. आयुक्त सादर करणार असलेल्या अंदाजपत्रकात त्याचे प्रतिबिंब कसे उमटले असेल, याबाबत चर्चा सुरू आहे.स्मार्ट सिटीमधील कामांसाठी हजारो कोटींचे आकडे गेले तीन महिने पालिकेत प्रशासनाकडून ऐकवण्यात येत आहेत. यासाठीचा साडेतीन हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव दिल्लीला पाठविण्यात आला असून तो तिथेच प्रलंबित आहे. २६ जानेवारीला याचा निकाल जाहीर होईल. अंदाजपत्रकात आयुक्तांनी स्मार्ट सिटीबाबत काय धोरण घेतले आहे, याबाबतही पालिका वर्तुळात उत्सुकता आहे.
पालिकेचे अंदाजपत्रक २५ रोजी
By admin | Published: January 07, 2016 1:44 AM