पुणे : पुणे महापालिकेचा २०२४-२५ या वर्षाचा अर्थसंकल्प गुरूवारी ७ मार्च रोजी महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे स्थायी समितीला सादर करणार आहेत. गेल्या वर्षी ९ हजार ५९२ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यंदाचा अर्थसंकल्प दहा हजार कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार आयुक्तांनी १५ जानेवारीपर्यंत स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प मांडणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेवर प्रशासक असल्याने अर्थसंकल्पाबाबत स्थायी समिती आणि मुख्य सभेत कोणताही निर्णय होत नाही. त्यामुळे या ठरावाला बगल देत मार्च महिन्यातच अर्थसंकल्प मांडण्यावर आयुक्तांनी भर दिलेला आहे. त्यावरून आयुक्तांवर टीका होत आहे.
सलग तिसऱ्या वर्षांतही ते मार्च महिन्यातच अर्थसंकल्प मांडणार आहेत. येत्या ७ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केला आहे. पालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील पायाभूत सुविधा, उड्डाणपूल, नदी सुधार प्रकल्प या प्रकल्पांसह पुणेकरांसाठी कोणत्या योजनांसाठी किती निधी असणार याची उत्सुकता पुणेकरांना लागली आहे.