पुणे :बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी आल्यानंतर परिसरात पार्क केलेल्या दुचाकींची चोरी करणाऱ्या चोरट्याला फरासखाना पोलिसांनी पकडले. त्यासाठी बुधवार चौकापासून देहूरोडपर्यंतचे तब्बल २०० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात भक्ती-शक्ती चौकात मिळालेल्या चोरट्याच्या केसाच्या ठेवणीवरून चोरटा हाताशी लागला. पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांनी ही माहिती दिली.
सोहेल युनूस शेख (२६, रा. पारसी चाळ, देहूरोड) असे त्याचे नाव आहे. फरासखाना पोलीस ठाण्यातच दाखल १७ गुन्ह्यांतील चोरलेल्या १६ दुचाकी त्याच्याकडून जप्त केल्या आहेत.
गेली सहा महिन्यांपासून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. या घटनांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दुचाकी चोरीच्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सांगितले होते. त्या आधारे पोलीस नाईक वैभव स्वामी आणि प्रवीण पासलकर यांनी तब्बल २०० सीसीटीव्ही फुटेज तपासत देहूरोडपर्यंत माग काढला. त्यानंतर त्याचा तपास लागला नव्हता. परंतु, बुधवार पेठेतूनच सर्व वाहने चोरीला जात असल्याने पोलीस संबंधित आरोपीच्या शोधातच होते. त्यामुळे पोलिसांनी परिसरात गस्त वाढविली होती.
सोहेल हा बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी आला असताना पोलिसांना संशय आला. त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने चोरीचे गुन्हे कबूल केले. त्याने ह्या सर्व दुचाकी देहूरोड येथे त्याच्या राहत्या घराजवळ पार्क केल्या होत्या, त्याच्याकडून १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, अंमलदार रिजवान जिनेडी, महावीर वल्टे, संदीप कांबळे, किशोर शिंदे यांच्या पथकाने केली.
केसाची ठेवण
सोहेल शेख हा वेश्यागमनासाठी बुधवार पेठेत येत होता. येथे आल्यानंतर प्रत्येक वेळी मास्टर चावीने दुचाकीचे लॉक उघडून तो एक दुचाकी चोरून नेत असे. बऱ्याच दिवसांपासून त्याचा हा प्रकार सुरू होता. त्याच आधारे त्याचा माग काढून त्याच्या लकबी व पेहरावावरून त्याला अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी सांगितले.