रवीकिरण सासवडे / बारामतीदूध खरेदीच्या दरात ऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर २ रूपये दरवाढ केली आहे. मात्र, जनावरांच्या खाद्यावर होणारा खर्च, त्यामध्ये झालेल्या वाढीचा परिणाम दूध उत्पादनावरदेखील होतो. शेतीपूरक व्यवसायाला ऊर्जितावस्था येण्यासाठी दूध खरेदीदरात केलेली वाढ दूध उत्पादकांसाठी भूलभुलय्याच ठरणार आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे दोन्ही तालुक्यातील वातावरण गरम झाले आहे. ‘मिनी विधानसभा’ पदरात पाडून घेण्यासाठी पक्षांतर्गत खेळ््यांसह मतदारांना देखील चुचकारण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. दोन्ही तालुक्यामंध्ये दूध उत्पादकांची संख्या मोठी आहे. शेतीला पूरक असणारा हा व्यवसाय आता अनेक शेतकरी कुटुंबाचा मुख्य व्यवसाय बनला आहे. हा ‘दूध उत्पादक मतदार’ डोळ्यांसमोर ठेवूनच दूध संकलन संस्थांनी दूध खरेदी दरामध्ये दोन रूपयांनी वाढ केली आहे. मात्र प्रत्यक्षात ही वाढदेखील फसवी आहे. पशुखाद्याची ५० किलोची गोणी १ हजार ६० रुपये, तर ६० किलोची गोणी १ हजार १७० रुपयांना मिळते. सर्वसाधारणपणे एक जर्सी किंवा होस्टन गाय जर दिवसाला १८ लिटर दूध देत असेल तर त्या गाईला एका दिवसात होणारा खर्च असा, सुका चारा ५ ते ७ किलोप्रमाणे- २० ते २५ रुपये, ओला चारा २५ ते ३० किलोप्रमाणे- ७५ ते ८० रुपये, तर गाईच्या तब्यतीनुसार दिवसाला ८० ते १२० रूपयांचे पशुखाद्य, तसेच यासर्व कामासाठी लागणारी दिवसाची मजुरी (पुरूष मजुर ३०० रूपये तर महिला मजूर १५० रूपये), या सर्वांचा खर्च धरला तर १८ लिटर दुधाचे ४३२ रूपये होतात. या अत्यल्प उत्पादनामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याच्या हाती काहीच राहात नसल्याचे चित्र आहे.मागील वर्षी दुधाचे दर प्रतिलिटर १७ रूपयांपर्यंत घसरले होते. दूध भुकटीच्या निर्यातबंदीचे कारण पुढे करीत त्यावेळी दूधसंकलन संस्थांनी दुधाच्या मलईवर ताव मारला होता. त्यावेळी दूधसंकलन संस्थांनी दूध भुकटीचे उत्पादन बंद करीत इतर उत्पादनांमधून भरपूर नफा कमवला होता. तत्कालिन दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांनी कमी दर देणाऱ्या संस्थांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात ही कारवाई कधीच कोणत्याही दूध संकलन संस्थेवर झाली नाही. दूध संकलन संस्थांच्या मनामानी कारभारामुळे दुध उत्पादक मात्र वेठीस धरला गेला आहे.एरवी ऊसदरासाठी सातत्याने आंदोलनाच्या पवित्र्यात असणाऱ्या शेतकरी संघटना दूध दराबाबत मात्र मूग गिळून आहेत.केवळ ऊस गळीत हंगामापुरतेच डोके वर काढणाऱ्या शेतकरी संघटनांना उसाव्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांबाबत स्वारस्य नसल्याचा आरोपही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.वास्तविक, दुधाच्या धंद्याने ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना तारले आहे. शेतकरी संघटनांनी या प्रश्नाकडे देखील गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.सध्या कच्च्या मालाचे दर कमी झाल्यामुळे बारामती दूध संघाने पशुखाद्याचे दर ११५ रूपयांनी कमी केले आहेत. सभादसांना संघामार्फत मोफत पशूवैद्यकीय सेवा दिली जाते. १ तारखेपासून दूध खरेदी दरामध्ये देखील २ रूपयांनी वाढ केली आहे. तसेच बारामती संघाच्या वतीने सभासदांना वेळोवेळी दूध उत्पादन वाढीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. - सतीश तावरे, अध्यक्ष, बारामती दूध संघ
दूध खरेदीदराची वाढ ठरणार ‘भूलभुलय्या’
By admin | Published: January 13, 2017 2:33 AM