पुणे : कोरोनाबाधित रुग्णांसाठी ३०० कोटी रुपयांचे तात्पुरते जंबो रुग्णालय उभारण्याआधी पुणे महापालिकेची सुमारे ८ ते १० बंद असलेली रुग्णालये व कमला नेहरू रुग्णालयातील आयसीयु यंत्रणा सुरु करावी, या मागणीसाठी शहरातील विविध संघटनांनी मंगळवारी महापालिकेसमोर निदर्शन केली. या रुग्णालयांनाच सक्षम केल्यास पुणेकरांसाठी कायमस्वरूपी उपयोगी पडतील, असे संघटनांची मागणी आहे. कोरोना काळात आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी विविध लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष राजकीय व सामाजिक संघटना, पक्ष यांनी एकत्र येत कोरोना विरोधी जन अभियान सुरु केले आहे. शहरांत रुग्णालयांतील खाटा, आॅक्सिजन, व्हेंटिलेटर यांचा तुटवडा जाणवत आहे. आॅगस्ट महिन्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याच्या कारणास्तव ३०० कोटी रुपये खर्च करुन नवीन जम्बो रुग्णालय उभारले जाणार आहे. पण दुसरीकडे मनपाच्या सर्वात मोठ्या ४५० खाटांच्या कमला नेहरू रुग्णालयाकडे दुर्लक्ष केले जात आहे. येथील आयसीयु सर्व उपकरणे व व्हेंटिलेटरसह सज्ज आहे. पण गेली अनेक वर्षांपासून बंद आहे. त्याचप्रमाणे बांधून तयार असलेली पण वापरात नसलेली मनपाची ८ ते १० रुग्णालये आहेत. तिथे आॅक्सीजन सिलेंडर, खाटा इत्यादी सुविधा देऊन सुरू करायला हवीत. त्यासाठी जम्बो रुग्णालयाला वापरण्यात येणारा निधी द्यावा. जंबो रुग्णालयासाठी डॉक्टर, परिचारिका नेमण्यासाठी दाखविली जाणारी राजकीय इच्छाशक्ती मनपाची रुग्णालये सुरु करण्यासाठीही दाखवावी, असे आवाहन करत संघटनांनी निदर्शने केली. या मागण्यांना डॉ. अनंत फडके, डॉ. अभिजित मोरे, डॉ. अरूण गर्दे, किरण मोघे, पौर्णिमा चिकरमाने, सुनिती सु.र. मेधा थत्ते, बाळकृष्ण सावंत, शकुंतला सविता, उदय भट, वर्षा गुप्ते, डॉ. संजय दाभाडे आदींनी पाठिंबा दिला आहे. -------------------सुरू नसलेली रुग्णालये- कर्वेनगर येथील कै बिंदूमाधव बाळासाहेब ठाकरे रुग्णालय- स्वारगेट जवळील मित्रमंडळ चौकामधील बाळासाहेब ठाकरे रुग्णालय- राजमाता जिजामाता रुग्णालय- येरवडा येथील भल्या मोठ्या राजीव गांधी रुग्णालयाचे वरचे तीन रिकामे मजले- डॉ. कोटणीस रुग्णालयाची जुनी इमारत- कर्णे रुग्णालय----------------
कोट्यवधींचे जम्बो रुग्णालये नंतर उभारा, आधी महापालिकेची बंद रूग्णालये सुरू करा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 6:55 PM
तात्पुरती जम्बो रुग्णालये उभी करण्याआधी प्रशासनाने पुणे शहरातील 8 ते 10 बंद अवस्थेतील रुग्णालये सुरु करावी..
ठळक मुद्देबंद रुग्णालये सुरू करण्याच्या मागणीसाठी शहरातील विविध संघटनांची महापालिकेसमोर निदर्शने