नितीश गोवंडे/सुमित डोळे -
पुणे/छत्रपती संभाजीनगर : पुण्यात अलिशान पोर्शे कारखाली दोन जणांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडील बिल्डर विशाल अग्रवालला अखेर अटक करण्यात आली. कोणास कळू नये म्हणून विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगर येथील एका पडक्या हॉटेलमध्ये लपला होता. पोलिसांना ही खबर लागताच त्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
रविवारी मध्यरात्री अपघात झाल्यानंतर बिल्डर विशाल अग्रवाल अटक होण्याच्या भीतीने गायब झाला होता. पुणे पोलिसांनी<तांत्रिक माहितीच्या आधारे अग्रवालचा छडा लावला व त्याला अटक करून पुण्यात आणले. पोलिसांना चकवा देण्यास अग्रवालने कारचालकांना दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबविले होते.
कोणत्याही परिस्थितीत अग्रवाल सुटता कामा नये, असे आदेश पुणे पोलिस आयुक्तांकडून छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांना देण्यात आले होते. अग्रवाल ताब्यात येईपर्यंत पोलिस आयुक्त अमितेश कुमार सतत पोलिस पथकांच्या संपर्कात होते. मध्यरात्री एक ते चार वाजेपर्यंत पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांना सुमारे ६० कॉल केले.
फोन केला बंदविशाल अग्रवालने त्याचा फोन बंद करून ठेवला होता. चालक चत्रभुज डोळस (३४) व सहकारी राकेश पौडवाल (५१) हे मराठवाड्यातील असल्याने त्यांनीच छत्रपती संभाजीनगरकडे जाण्याचे सुचविले. पुणे पोलिसांनी अग्रवालच्या जवळच्या लोकांचे फोन ट्रेस करण्यास सुरुवात केली. यावरून त्याचा छडा लागला. अग्रवालला त्याच्या सूत्रांमार्फत पोलिसांच्या कारवायांमार्फत माहिती मिळत होती.
‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार बड्या बापाच्या अल्पवयीन मुलाने अपघातापूर्वी पार्टीत दोन तासांत मद्य व जेवणावर मित्रांसोबत ४८ हजार रुपये उडवल्याची माहिती त्यानेच पोलिसांना दिली. अल्पवयीन मुलगा व त्याच्या मित्रांनी हाॅटेल कोझी आणि हाॅटेल ब्लॅकमध्ये मद्य प्राशन केले. पोलिसांनी दोन्ही हाॅटेलमधील चित्रीकरण तपासले. हाॅटेलमधील बिल मुलाने ऑनलाइन दिल्याचे उघडकीस आले आहे.
राहुल गांधी म्हणाले, निबंधाची शिक्षा का?बसचालक, साधा रिक्षाचालक यांच्याकडून अपघात झाला तर त्याला १० वर्षांची शिक्षा होते, पण एका श्रीमंत बापाच्या पोराने आलिशान गाडीने दोघांना ठार केले तर साधी निबंध लेखनाची शिक्षा देऊन सुटका होते कसे, असे राहुल गांधी म्हणाले.