पुणे : भागीदारीत सुरू केलेल्या फर्मच्या बँक खात्यामध्ये अफरातफर करुन ५ कोटी २१ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी बिरला कोटबागी प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे डॉ. महेश श्रीपाद कोटबागी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०१० ते २०१८ या कालावधीत वारजे येथील जुना जकात नाक्याजवळ असलेल्या फर्मच्या कार्यालयात घडला आहे.
याप्रकरणी माणिक रामचंद्र बिरला (५५, रा. कर्वेनगर) यांनी वारजे पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. २०) फिर्याद दिली आहे. यावरून डॉ. महेश कोटबागी व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बिरला आणि आरोपी कोटबागी यांनी २०१० मध्ये बिरला कोटबागी प्रमोटर्स अँड बिल्डर्स यानावाने भागीदारीत फर्म सुरू केली. या फर्मने एक जागा विकसनासाठी घेऊन त्याठिकाणी अपार्टमेंट बांधली. आरोपींनी अपार्टमेंटमधील फ्लॅट धारकांच्या करण्यात आलेल्या काही अॅग्रीमेंट टु सेल व हमीपत्रावर फिर्यादी माणिक बिरला यांच्या बनावट सह्या केल्या.
तसेच फिर्यादी बिरला यांच्या वडिलांचे २०१० साली निधन झाले असताना आरोपींनी कॉर्पोरेशनच्या रिव्हाईस प्लॅनवर त्यांच्या खोट्या सह्या केल्या. आरोपींनी बिरला कोटबागी फर्मच्या नावाने बँकेतील खात्यात अफरातफर करुन बिरला यांची ५ कोटी २१ लाख ३२ हजार ९९ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी बिरला यांनी तक्रार अर्ज केला होता, त्या तक्रार अर्जाच्या चौकशी नंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक वेताळ करत आहेत.