पुणे : पर्यावरण नियमांचे उल्लंघन, बेकायदेशीर बांधकाम आदी कारणांमुळे चर्चेत आलेल्या लवासा हिल स्टेशन प्रोजेक्टच्या खरेदीसाठी पुण्यातील बिल्डर अनिरुद्ध देशपांडे यांनी बोली लावली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर लवासा प्रकल्प आर्थिक डबघाईला आला. त्यामुळे या प्रकल्पाच्या विक्री व्यवहाराची चर्चा सुरु झाली. त्यासाठी देशपांडे यांच्यासह दिल्ली आणि गुरगाव येथील अन्य दोन कंपन्यांनीही बोली लावली आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेला लवासा प्रकल्प प्रारंभीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. आता प्रकल्पाचा विक्री व्यवहार नँशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (एनसीएलटी)च्या अखत्यारीत चालू आहे. लवासा प्रकल्पाच्या खरेदीसाठी पुढे आलेल्या तीन कंपन्यांच्या बोलीवर येत्या डिसेंबरअखेर निर्णय होण्याची शक्यता आहे. लवासा प्रकल्प खरेदीसाठी पुढे आलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अनिरुद्ध देशपांडे यांनी या प्रकल्पात यापूर्वीही म्हणजे सन २००७ मध्येही गुंतवणूक केली होती. पुढे त्यांनी त्यांचे समभाग हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला विकले होते. दरम्यान लवासा कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीला विविध वित्तसंस्थांची सुमारे साडेपाच हजार कोटी रुपयांची देणी आहेत. तसेच ‘लवासा’त मालमत्ता खरेदी केलेल्यांचेही सुमारे चारशे कोटी रुपयांचे देणे असल्याचे सांगितले जाते.
अमेरिकेतील फंड कंपनीसोबत मी लवासा प्रकल्प खरेदी करण्यासाठी बोली लावली आहे. मात्र व्यवहाराची ही प्रक्रिया खूप वेळखाऊ आहे. .” -अनिरुद्ध देशपांडे, सिटी कॉर्पोरेशन