पुणे - शहरातील कोंढवा परिसरात भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. मृत मजूर इमारत बांधकामासाठी पुण्यात वास्तव्य करत होते. मध्यरात्री 1.30 च्या सुमारात ही दुर्दैवी घटना घडली. पोलीस, एनडीआरएफ आणि महापालिका प्रशासन यांच्याकडून रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरु आहे. आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेबाबत बोलताना एनडीआरएफचे सच्चिदानंद गावडे यांनी सांगितले की, कोंढवा परिसरात असणाऱ्या आल्कन स्टायलस इमारतीची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. या इमारतीच्या बाजूला सुरु असलेल्या निर्माणधीन इमारतीच बांधकाम सुरु होतं त्याठिकाणी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत इमारतीत पार्किंगला असणाऱ्या 4 गाड्याही खाली कोसळल्या.
घटनास्थळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाहणी केली असून प्रथमदर्शनी या घटनेत बिल्डर, कंत्राटदारांचा निष्काळजीपणा भोवला असल्याचं दिसतंय मात्र या घटनेची संपूर्ण चौकशी करू असं सांगितले आहे. मृत मजूर हे पश्चिम बंगाल आणि बिहारमधून आल्याचं सांगितलं जातं. पुण्यात सुरु असणाऱ्या पावसाने इमारतीजवळील जमीन भुसभूसीत झाली त्यामुळे संरक्षक भिंत कोसळली.
प्रशासनाकडून बचावकार्य सुरु आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे मात्र कदाचित हा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जाते. कोंढव्यातील ही घटना दुर्दैवी आहे, यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी दिली आहे.
तसेच या दुर्घटनेतील मृत्यूला बिल्डर आणि महापालिकेचे अधिकारी दोषी आहेत असा आरोप माजी आमदार महादेव बाबर यांनी केला आहे.