एक अटकेत : पावणे चार लाखांची फसवणूक : खोट्या गुन्ह्यात अडविण्याची दिली धमकी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शुुभ ट्रेड बीज इंडिया या कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यास सोने आणि चारचाकी गाडी देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची पावणे चार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पैसे परत मागितल्यावर बांधकाम व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून खोट्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी पोलीस कर्मचाऱ्याने दिली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी पोलीस कर्मचार्यासह कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अभिजित धोंडिबा सावंत (वय ४०, रा. कोल्हापूर) याला अटक केली आहे.
पोलीस कर्मचारी संतोष सावंत व शुभ ट्रेड बीज इंडिया लि., लायब्लिटी पाटर्नरशीप या कंपन्याचे सर्व संचालक अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. या प्रकार नवले पुलाजवळील सावंत याचे कार्यालय व कोल्हापूर येथील कार्यालयात जुलै २०२० ते २० जानेवारी २१ दरम्यान घडला.
निखिल लक्ष्मणराव मिरगे (वय २९, रा. सरगम सोसायटी, नांदेड सिटी) यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभ ट्रेड बीज कंपनीमध्ये पैसे गुंतविल्यास दरमहा मोठ्या परतावा तसेच दुचाकी, चारचाकी गाड्या, सोने यासारखी मोठी बक्षिसे कंपनीतर्फे देण्यात येतील असे आमिष दाखविले. त्यावर विश्वास बसावा म्हणून वृत्तपत्र, युट्यूब, फेसबूक यासारख्या माध्यमातून कंपनीविषयी आकर्षक जाहिराती दिल्या. फिर्यादी यांना कंपनीत ६३ लाख रुपये गुंतविण्यास भाग पाडले. सुरुवातीला ३ लाख ७८ हजार रुपयांचा परतावा दिला. त्यानंतर आतापर्यंत कोणताही परतावा न देता गुंतवणूक केलेल्या रक्कमेचा अपहार केला. फिर्यादी व त्यांचे दाजी हे रक्कम मागण्यासाठी अभिजित सावंत यांच्या नऱ्हे येथील कार्यालयात गेले असताना त्यांनी शिवीगाळ करत पिस्तूल दाखवून फिर्यादी यांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांचा पोलीस खात्यातील भाऊ संतोष सावत यानेही फिर्यादी यांचे दाजी यांना बोलावून घेऊन शिवीगाळ करीत पैसे मागितल्यास खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. गुंडामार्फत त्यांच्या मर्सिडीज गाडीचे वायपर व साईड मिरर तोडून नुकसान केले.