पुणे : शहरात सुरू असलेल्या बांधकामामुळे वायू प्रदूषण वाढले आहे. हे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीनुसार कार्यवाही करावी, अशी सूचना दिली आहे. त्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली असून, त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही पुणे महापालिकेने दिला आहे.
पुणे महापालिकेचे शहर मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांनी ही माहिती दिली. शहराच्या उपनगरांमध्ये विशेषत: कोथरूड, बाणेर, बालेवाडी, वारजे माळवाडी, कर्वेनगर, धायरी, नर्हे, कात्रज, आंबेगाव, हडपसर, कोंढवा, मुंढवा, खराडी, धानोरी, येरवडा, विश्रांतवाडी, बोपोडी तसेच मध्यवर्ती पेठांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. तसेच सिंहगड रस्ता, विश्रांतवाडी, गणेश खिंड रस्ता यासह अन्य भागात उड्डाण पूल, रस्ते, मेट्रोची कामे सुरू आहेत. या कामामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे.
गेल्यावर्षी देखील धुलीकणाचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने सुचविलेल्या उपाययोजना करणे बंधनकारक केले होते. मात्र, शहरातील अनेक बांधकाम व्यावसायिक व प्रकल्पांचे ठेकेदार यांच्याकडून बांधकाम नियमावली पाळली जात नाही. परिणामी धुलीकण निर्माण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. बांधकामामुळे हाेणाऱ्या प्रदूषणामुळे आरोग्यास हानीकारक असलेल्या पीएम २.५ धुलीकणांचे प्रमाण वाढले आहे. हे धुलीकणाचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाने सर्व बांधकाम व्यावसायिक, आर्किटेक्ट, बांधकाम राडाराेडा वाहतूक करणारे आदींना ई-मेलद्वारे प्रदूषण कमी करण्यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीचे पालन करावे, अशा सूचना दिल्या आहेत. उपाययाेजना करण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे, असे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले.
उपाययोजनांकडे सोईस्कर दुर्लक्ष
शहरात वाढलेले धोकादायक धुलीकणांचे प्रमाण लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने मागील वर्षी बांधकाम व्यावसायिकांसाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यात धूळ उडणार नाही, यासाठी संबंधितांनी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यात बांधकामाच्या सीमाभिंतीला २५ फूट उंचे पत्रे लावणे, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाण हिरव्या कापडाने झाकणे, या कापडावर पाणी मारणे यातून धूळ उडण्यावर नियंत्रण आणणे, तसेच रस्त्याच्या कडेला काम सुरू असल्यास त्यावर वर्दळीच्या वेळी पाणी मारणे, राडाराेड्याची वाहतूक करताना ताे झाकून न्यावा अशा उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर, महापालिकेची तपासणी होईपर्यंतच या नियमांचे पालन झाले, मात्र त्यानंतर अनेक व्यावसायिकांनी या नियमांना हरताळ फासला आहे.