मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील मांगदरी येथील जिल्हा परिषद शाळेची जुनी शाळा केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. या शाळेच्या दुरुस्तीबाबत तालुका प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनदेखील प्रशासनाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे, अशी माहिती मांगदरीचे सरंपच तानाजी मांगडे यांनी दिली.मांगदरी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत खूप जुनी झाली आहे. छतावरील कौले उडाली असून, लाकडे कुजली आहेत. भिंती जुन्या झाल्याने कमकुवत झाल्या आहेत. दररोज काही प्रमाणात त्या ढासळत आहेत. रिकाम्या असलेल्या वर्गखोल्यात झाडेवेली वाढल्या आहेत. या ठिकाणी विषारी सापांचा वावर असल्याचे सरपंच तानाजी मांगडे यांनी सांगितले. या जुन्या इमारतीसमोर नवीन इमारतीमध्ये पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरतात. मधल्यासुटीतही विद्यार्थी शाळेच्या परिसरात खेळत असतात. ही इमारत केव्हाही कोसळू शकत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दुरुस्तीबाबत प्रशासनाला लेखी प्रस्ताव देऊनदेखील काहीच हालचाल झाली नाही. या जुन्या इमारतीचा वापर सार्वजनिक कार्यक्रमासाठी केला जात असून, या ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अपघात होण्याआधीच शाळा दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
मांगदरी शाळेची इमारत धोकादायक
By admin | Published: June 29, 2015 6:24 AM