लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मंडई परिसरात मेट्रो प्रकल्पासाठी लागणारी जागा महापालिकेची होती, ती त्यांनी रिकामी करून दिली. तिथून विस्थापित होणाऱ्या व्यावसायिकांना महामेट्रोने त्याच परिसरात गाळे बांधून दिले असल्याचे ‘महामेट्रो’ने सांगितले.
मंडईमधील फळबाजार व त्या भागातील काही गाळे महापालिकेने शनिवारी (दि. २९) काढून टाकले. या जागेत मेट्रोचे भुयारी स्थानक आहे. सध्या त्याचे काम सुरु आहे. महामेट्रोने ही जागा महापालिकेकडे मागितली होती. त्यावर जुना फळबाजार व काही दुकाने होती. महापालिकेने शनिवारी दुपारी ते काढून टाकले.
महामेट्रोच्या जनसंपर्क विभागाचे संचालक हेमंत सोनवणे म्हणाले, “विस्थापित झालेल्या १०३ व्यावसायिकांसाठी त्याच भागात तीन ठिकाणी गाळे बांधून दिले आहेत. ते महापालिकेकडे हस्तांतरित केले आहेत. त्याचे वाटप आता महापालिका करेल.” ही जागा मेट्रोच्या भुयारी स्थानकाचे काम पूर्ण होईपर्यंतच महामेट्रोला हवी आहे. काम पूर्ण झाल्यावर ती पुन्हा महापालिकेकडे दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.