पुणे : माणसाने हव्यासापोटी पर्यावरणाचे अताेनात नुकसान केले आहे. आता आपण अशा टप्प्यावर आहाेत की, इथून पुढचा टप्पा विध्वंसाचा असणार आहे. विकासाच्या संकल्पना बदलाव्या लागतील आणि त्याचा प्रामुख्याने अभियंत्यांना विचार करावा लागणार आहे. हे जग अभियंत्यांनी बदलले आहे. जगात चार वेळा औद्योगिक क्रांती झाली त्यातही अभियंत्यांचे याेगदान प्रचंड महत्त्वाचे हाेते, असे मत ‘लाेकमत’च्या पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केले.
पीएमसी इंजिनिअर्स असाेशिएशनतर्फे अभियंता दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते. यावेळी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पुणे मनपा कामगार युनियनचे अध्यक्ष उदय भट, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, पथ विभागाचे व्ही.जी.कुलकर्णी, माजी उपाध्यक्ष नरेंद्र वाघ, मुंबई अभियंता संघाचे रमेश भुतेकर, अभियंता मित्र मासिकाचे संपादक कमलकांत वडेलकर, पीएमसी एम्प्लाॅइज युनियन अध्यक्ष बजरंग पाेखरकर उपस्थित हाेते.
आवटे म्हणाले, शाश्वत विकासापासून आपण काेसाेदूर आहाेत. सर्वसामान्य माणूस आपला केंद्रबिंदू असला पाहिजे. एका अर्थतज्ज्ञाने सांगितल्यानुसार आपण उद्याच्या पिढ्यांचे पाकीट मारत आहाेत. राज्याचा निम्मा विकास तीन जिल्ह्यांत एकवटला आहे. त्यामुळे लाेकांना पुण्यात येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. उद्याच्या पिढ्यांना काय देणार आहात? मेट्राे, बुलेट ट्रेन, टाेलेजंग इमारती उभा केल्या; मात्र दुसरीकडे ‘मुळा’, ‘मुठा’, ‘पवना’ संपली असून, शाश्वत विकास ही महत्त्वाची गाेष्ट आहे. काेविड प्रादुर्भाव काळात पुणे महापालिकेने सर्वाेत्तम काम केले असून, अवघ्या २१ दिवसांत रुग्णालय उभं केलं हाेतं, त्यात अभियंत्यांचा माेठा वाटा हाेता.
‘सिलिकाॅन व्हॅली’तील अभियंत्यांपेक्षा तुम्ही महत्त्वाचे
‘सिलिकाॅन व्हॅली’मध्ये नाेकरी करणाऱ्यांपेक्षा सरकारी, तसेच महापालिकेतील अभियंते खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला लाेकांच्या समस्या साेडविणे आणि शहर उभे केल्याचे जे समाधान आणि आनंद मिळताे, ताे ‘सिलिकाॅन व्हॅली’तील कराेडाे रुपये कमविणाऱ्या अभियंत्यांना मिळणार नाही.
समस्या साेडविण्यासाठी इनाेव्हेशनची गरज
पुणे शहराच्या आकारासह समस्या आणि त्यांची जटिलताही वाढली आहे. भविष्यात तुमच्यासमाेर नवनवीन आव्हाने उभी राहतील. त्यानुसार स्वत:ला अपग्रेड करा आणि उपाय शाेधा. अभियांत्रिकीचे बदलते ज्ञान आत्मसात करा. नागरिकांकडून खूप माेठ्या अपेक्षा आहेत. त्यांचे प्रश्न साेडविण्यासाठी तुम्ही ज्या पाणीपुरवठा, ड्रेनेज, बांधकाम आदी विभागांत काम करता त्यात इनाेव्हेशन करा. - रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा
करदात्यांना टीका करण्याचा अधिकार
अभियंत्यांनी कामाचा दर्जा उत्तम ठेवत जगातील सर्वाेत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करावा. जपानमधील सहा डब्ल्यू आत्मसात करीत चिकित्सक बुद्धीने काम करावे. तुम्ही अभियंत्यासह व्यवस्थापक व्हावे. समस्याग्रस्त लाेकांचे प्रश्न साेडविण्याची ही व्यवस्थापन तत्त्वे उपयाेगी पडतील. करदात्यांना टीका करण्याचा अधिकार आहे. टीका खरी असेल तर अभियंत्यांनी त्यात सुधारणा करीत आणखी चांगले काम करून प्रत्युत्तर द्यावे. - प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे मनपा
कार्यक्रमात सेवानिवृत्त झालेले अभियंते विवेक खरवडकर, मीरा सबनीस, संजय शेंडे, राजेंद्र अर्धापुरे, जयंत काळे, संजय अदिवंत, रंगनाथ तासकर, प्रदीप हरदास, सुनील बाेरसे यांचा सत्कार करण्यात आला; तसेच गुणवंत अभियंता पुरस्काराने दिनकर गाेजारे (अभियंता, स्थापत्य), जितेंद्र कुरणे (अभियंता, यांत्रिकी), उपअभियंता : राजेश फटाले, रवींद्र पाडळे, अशाेक केदारी, कनिष्ठ अभियंता : सुशील माेहिते, संजय शिंदे, उदय पाटील, पूनम पवार आणि दीपाली तिकाेने यांना गाैरविण्यात आले. उत्कृष्ट सांघिक कार्याबद्दल युवराज देशमुख (अधीक्षक अभियंता), बिपिन शिंदे (कार्यकारी अभियंता), उपअभियंते जयवंत पवार आणि संदीप शिंदे, कनिष्ठ अभियंते किरण अहिरराव, निखिल गुलेच्छा यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला.