केडगाव : पारगाव तालुका दौंड येथील माजी सरपंच राजेंद्र विष्णू शिशुपाल यांनी स्वतःच्या घरावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला आहे. हा पुतळा येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. नव्याने बांधलेल्या स्वतःच्या दुमजली घराला क्रांतीसुर्य नाव दिले आहे. टेरेसवर ६ फुट उंचीचा पुतळा आकर्षक दिसत आहे.
सोनेरी रंगाचा असणारा, अंगावर कोट, पॅन्ट, हातात संविधान व चष्मा असा वेशभूषा केलेला हा पुतळा हुबेहूब दिसत आहे. पुणे येथील एका कारागिराकडून त्यांनी हा पुतळा बनवून घेतल्याचे सांगितले. या पुतळ्याकडे जाण्यासाठी लोखंडी जिना उभारला आहे. दररोज या पुतळ्याची शिशुपाल व त्यांच्या पत्नी अलका या मनोभावे पूजा करतात. प्रत्येक सणासुदीला विशेष पूजा केली जाते. पुतळ्याला हार अर्पण केला जातो.
प्रत्येक वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पुण्यतिथी व संविधान दिनादिवशी या पुतळ्याची विशेष पूजा केली जाणार आहे. आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन राजेंद्र शिशुपाल यांनी शब्द भेट साहित्य सेवा संघाची स्थापना केली. शिशुपाल हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून उत्कृष्ट कवी देखील आहेत. स्वतः लिहीलेली ७ पुस्तके त्यांनी प्रसिद्ध केली आहेत. तसेच शिशुपाल यांचे कुटुंब उच्च शिक्षित आहे. त्यांची दोन्ही मुले प्रशांत व प्रसाद हे प्राध्यापक असून मुलगी प्रतिक्षा डी.एड. झाली आहे. दोन्ही सुना उच्चशिक्षित आहेत.
यासंदर्भात राजेंद्र शिशुपाल म्हणाले, माझे वडील विष्णू शिशुपाल हे गवंडी काम करायचे, मला लहानपणापासून वाचनाची व लेखनाची आवड होती. माझ्या विचारांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पगडा आहे. आंबेडकर दिवसातून १८ तास अभ्यास करायचे. या अभ्यासाची प्रेरणा घेऊनच मी प्रतिकुल परिस्थितीमध्ये शिक्षक बनलो, संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित केले. वाचन ,लेखन ,वक्तृत्व अगदी गुणांची जोपासना डॉ. आंबेडकरांच्या विचारामुळेच माझ्यावरती झाली. त्यामुळेच माझे कुटुंब उच्चशिक्षित व स्थिरस्थावर झाले असे मी समजतो. आंबेडकर यांच्या प्रती असणाऱ्या आदरामुळे मी माझ्या घरावरती त्यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाने या निर्णयाला साथ दिली.