पुणे : पुण्यातील खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शर्यत पाहत असताना एका मुलाला घोडीने उडवले पण बैलाने वाचवल्याची थरारक घटना कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून अंगावर नक्कीच काटे येतील अशी ही घटना आहे.
पुण्यात अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते. असंख्य उत्साही गावकरी न घाबरता या कार्यक्रमात सहभागी होतात. त्याप्रमाणे या घाटातील शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. बैलगाडा शर्यत सुरु झाल्यावर नेहमी पुढे एक घोडी असते. तिच्यामागे सर्व बैल धावत असतात. या घाटातील शर्यतीत पुढे घॊडी आणि बैलगाडे धावत असताना समोरील बाजूला काही मुले थांबली होती. घोडे आणि बैल वेगाने येताना पाहून सर्व बाजूला सरकू लागले. परंतु एक मुलगा अचानकच घोडीच्या समोर आल्याने घोडीची धडक मुलाला बसली. आणि घोडीवरील माणूस, घोडी आणि मुलगा तिघेही खाली कोसळले. पण मागे धावणाऱ्या बैलाने त्याच क्षणी पटकन दुसरीकडे उडी मारली. त्या मुलाला न तुडवता तो बैल दुसऱ्या दिशेने धावून गेला. त्यामुळे त्या मुलाचा जीव थोडक्यात बचावला. पण तो मुलगा गंभीर जखमी झाला.