सणसर : बैलाचा पाय घसरल्याने ऊसाने भरलेली बैलगाडी कालव्यात पडली. मात्र, गाडीवान महिलेला पोहता येत असल्याने दुर्घटना टळली. दोन्ही बैलही पोहत पाण्याबाहेर आले.
इंदापूर छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम चालू आहे. सणसर नजिक बोरी पूल येथे अचानक देविदास बाबा गाडे यांच्या बैलाचा पाय घसरल्याने सुमारे दोन ते अडीच टन उसाने भरलेली बैलगाडी कालव्यात पडली.
या गाडीवर देविदास गाडे यांची पत्नी बसली होती. त्यांना पोहायला येत असल्यामुळे त्या पाण्यात गाडी पडल्यानंतर पोहत सुखरूप बाहेर आल्या. दोन्ही बैल गळ्यातील जुपनी तुटल्याने तेही गाडी पासून बाजूला जाऊन पोहत बाहेर आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या ठिकाणी छत्रपती कारखान्याचे सुपरवायझर महेश काटे, शेतकरी कृती समितीचे विशाल पाटील ,सचिन निंबाळकर यांनी भेट दिली. कारखान्याच्या जेसीबीच्या सहाय्याने बैलगाडी कालव्या बाहेर काढली.