अवसरी (पुणे) : जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथील माउलीकृपा बैलगाडा संघटनेच्या पोपट, सुरेश सोनबा बढेकर यांच्या बैलगाडा शर्यतीत धावणाऱ्या एका बैलाची (लक्ष्या) विक्री तब्बल ३० लाख ११ हजार १११ रुपयांत विक्री झाल्याचे माउलीकृपा बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष श्याम बढेकर यांनी सांगितले.
लक्ष्या बैलाने पुणे जिल्ह्यातील अनेक घाटांमध्ये विजेतेपद मिळवून बक्षिसे व नावलौकिक मिळविला आहे. या लक्ष्या बैलाची खरेदी गावडेवाडी ( ता.आंबेगाव) येथील कैलास भगवंता गावडे यांनी केली आहे. आंबेगाव तालुक्यात या बैलाची किंमत विक्रमी झाल्याने ‘लक्ष्याची कमाल, बैलमालकाची ३० लाख ११ हजार १११ रुपयांची धमाल’ अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे. बैलगाडा शर्यती हा विषय ग्रामीण भागातील गाडा-बैलमालक व हौशी शेतकरी यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. पण कित्येक दिवस या बैलगाडा शर्यतीवर शासनाची बंदी होती. बैलगाडा शर्यतींना न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील यात्रा-जत्रा येथील बैलगाडा शर्यतीच्या घाटात बैलगाडे धावू लागले आहेत. त्यामुळे बैलगाडामालक शौकीन सुखावले आहेत.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यात्रा-जत्रा उत्सव सुरू झाल्याने बैलगाडा शर्यतीस ठिकठिकाणी प्रारंभ झाला. असून, बैलगाडा घाटात भंडाऱ्याची उधळण व धुराळा उडताना दिसत आहे. हौसेला मोल नसते असे म्हणतात, या म्हणीचा अनुभव ''लक्ष्या'' बैलखरेदीच्या निमित्ताने आला असल्याचे बैलगाडा मालक सांगत आहे.